आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

६८व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ७९ वर्षीय आशा पारेख यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे
आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी याबाबतची घोषणा केली. दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो. ६८व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात ७९ वर्षीय आशा पारेख यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

यापूर्वी, २०१९ मध्ये साऊथचे सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. एखाद्या महिलेला दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्याची ही गेल्या २२ वर्षांतील पहिलीच वेळ आहे. गायिका आशा भोसले यांना हा पुरस्कार २००० साली देण्यात आला होता, त्यानंतर आशा पारेख या पहिल्या महिला ठरल्या आहेत.

आशा पारेख यांच्या आधी आशा भोसले, लता मंगेशकर, दुर्गा खोटे, कानन देवी, रुबी मेयर्स, देविका राणी यांना हा पुरस्कार मिळाला होता. १९६९ मध्ये देविका राणी हा पुरस्कार मिळवणारी पहिली अभिनेत्री होती. या पुरस्कारामध्ये सुवर्ण कमळ पदक, एक शाल आणि रोख १०,००,००० रुपये यांचा समावेश आहे.

अभिनेत्री आशा पारेख यांचा जन्म २ ऑक्टोबर १९४२ रोजी गुजरातमधील महुआ येथे एका मध्यमवर्गीय गुजराती कुटुंबात झाला. त्यांचे वडील हिंदू तर आई मुस्लीम होत्या.१९५९ मध्ये ‘दिल देके देखो’ या चित्रपटात नायिका म्हणून झळकलेल्या आशा पारेख यांची बालपणी डॉक्टर होण्याची इच्छा होती. ‘आसमान’ (१९५२) या चित्रपटाद्वारे बालकलाकार म्हणून आपल्या करिअरला सुरुवात करणाऱ्या आशा पारेख यांना या चित्रपटानंतर ‘बेबी आशा पारेख’ या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी अभिनयात पदार्पण केले होते. त्यानंतर एका स्टेज प्रोग्राममध्ये त्यांच्या नृत्याने प्रभावित होऊन दिग्दर्शक बिमल रॉय यांनी त्यांना वयाच्या बाराव्या वर्षी ‘बाप बेटी’ या सिनेमात घेतले.

आशा पारेख यांनी आपल्या फिल्मी प्रवासात अनेक अभिनेत्यांबरोबर काम केले; मात्र अभिनेते राजेश खन्ना यांच्यासोबतची त्यांची ऑनस्क्रीन जोडी गाजली. ‘कटी पतंग’ या चित्रपटात राजेश खन्ना यांच्याबरोबरची आशा पारेख यांची केमिस्ट्री लाजवाब होती.

आशा पारेख यांचे प्रमुख चित्रपट

जब प्यार किसी से होता हैं (१९६१), घराना (१९६१), छाया (१९६१), फिर वही दिल लाया हूं (१९६३), जिद्‍दी (१९६४), मेरे सनम (१९६५), तिसरी मंजिल (१९६६), लव इन टोकियो (१९६६), उपकार (१९६७), कटी पतंग (१९७०), आन मिलो सजना (१९७०), मेरा गांव मेरा देश (१९७१), राखी और आंदोलन (१९७१).

अनेक पुरस्कारांच्या मानकरी

आशा पारेख यांना करिअरमध्ये अनेक पुरस्कार मिळाले. ‘कटी पतंग’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार (१९७०), पद्मश्री सन्मान (१९९२), जीवनगौरव पुरस्कार (२००२), भारतीय सिनेमांतील उत्कृष्ट कामासाठी आंतरराष्ट्रीय भारतीय फिल्म अकादमी सन्मान (२००६), भारतीय वाणिज्य आणि उद्योग मंडळ महासंघाच्या वतीने (फिक्की) ‘लिविंग लिजेंड’ सन्मानही त्यांना मिळाला.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in