दहीहंडी उत्सवाला यंदा राजकीय रंग; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाखोंच्या बक्षिसांची लयलूट

यंदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार असल्याने दहीहंडी उत्सवात लाखो रुपयांच्या बक्षीसांची लयलूट होणार आहे. वरळीत भाजपच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सवात तब्बल ५० लाखांहून अधिक बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

मुंबई : कुठलाही सण असो मुंबईत त्या सणाचा उत्साह आगळाच अनुभवयास मिळतो. येथील सण, उत्सव अनेकदा राजकीय रंगात न्हाऊन निघतात. यंदा तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार असल्याने दहीहंडी उत्सवात लाखो रुपयांच्या बक्षीसांची लयलूट होणार आहे. वरळीत भाजपच्या वतीने आयोजित दहीहंडी उत्सवात तब्बल ५० लाखांहून अधिक बक्षिसांची घोषणा करण्यात आली आहे. तर घाटकोपर येथील भाजप आमदार राम कदम यांची दहीहंडी नेहमीच मोठ्या रकमेच्या बक्षिसांसाठी ओळखली जाते. मात्र, यंदा त्यांनी अद्याप बक्षिसांची रक्कम गुलदस्त्यात ठेवली आहे. मात्र, निवडणुकीआधी दहीहंडी उत्सव आल्याने या उत्सवाच्या माध्यमातून राजकीय पक्षांनी मत पेरणीला सुरुवात केली आहे.

दहीहंडी उत्सवाची मुंबईत वेगळीच धमाल मस्ती अनुभवता येते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदा दहीहंडी उत्सवात राजकीय शक्तिप्रदर्शन मोठ्या प्रमाणावर होणार आहे. मुंबईसह ठाण्यात विविध राजकीय पक्षांनी दहीहंडीचे आयोजन केले आहे. या उत्सवात यंदा अनेक सेलिब्रिटी, नेते मंडळी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावणार असल्याने गोविंदांचा उत्साह द्विगुणित होणार आहे.

अनेक ठिकाणी पाच, सहापासून ९ ते १० थरांचे चित्तथराराक मानवी मनोरे रचण्याची स्पर्धा यंदाही दिसून येणार आहे. त्यात कोणते गोविंदा पथक बाजी मारणार याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. उंच उंच थर लावून हंडी फोडणाऱ्या गोविंदांसाठी लाखोंच्या बक्षिसांची लयलूट होणार आहे. मुंबईत ठिकठिकाणी दहीहंडी बांधण्यात आल्या आहेत. काळाचौकी, लालबाग, परळ, दादर, वरळी, घाटकोपर, फोर्ट, चेंबूर, जोगेश्वरी आदी ठिकाणी गोविंदा पथकांना हंडी फोडण्याचे चांगलेच आव्हान असणार आहे. अनेक ठिकाणच्या आयोजकांनी हंडी फोडणाऱ्या गोविंदांसाठी सेफ्टी गियर, जमिनीवर गाद्या, हारनेस्ट आणि रुग्णवाहिकांची सोय केलेली आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या उत्सवात राजकीय नेत्यांचा सहभाग लक्ष वेधणारा असणार आहे.

गेल्या काही वर्षात दहीहंडी उत्सवाला राजकारण्यांनी ‘हायजॅक’ केले असून दहीहंडी उत्सवाच्या नावाखाली मतदारराजाला आकर्षित करण्यासाठी लाखोंच्या बक्षिसांची लयलूट करण्यात येणार आहे. शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ असलेल्या वरळीत भाजपने दहीहंडीचे आयोजन केल्याने ठाकरेंचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या वरळीत भाजप आपली पकड घट्ट करत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. तर मागाठाण्यात शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्यावतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात येते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तेथे उपस्थिती असणार आहे.

मुंबई, ठाण्यातील राजकीय दहीहंड्या

  • वरळीत भाजपच्या वतीने आयोजित ‘परिवर्तन दहीहंडी’

    (५० लाखांची बक्षिसे)

  • ठाण्यात ‘संस्कृती युवा प्रतिष्ठान’ची दहीहंडी

    (२१ लाख रुपयांचे रोख पारितोषिक)

  • ठाण्यात कॅसलमिल चौकात ‘गोकुळ दहीहंडी’

    (एकूण ५५ लाख रुपयांची बक्षिसे)

logo
marathi.freepressjournal.in