

मुंबई : ‘हंडीचे ठाणे’ अशी ओळख असलेल्या ठाण्यात दहीहंडीच्या निमित्ताने यंदाही १० थर रचण्याची चुरस रंगणार आहे. मुंबई आणि ठाण्यातील प्रमुख गोविंदा पथकांनी १० थरांचे लक्ष्य ठेवले आहे. यामध्ये कोणते पथक यशस्वी ठरते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यंदा कोणते मंडळ ११ थरांचा विक्रम मोडणार, याचीही उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.
गेल्या वर्षी जोगेश्वरीच्या कोकण नगर आणि जोगेश्वरीच्या जयजवान या पथकांनी मिळून चार वेळा १० थर रचून विक्रम केला होता. यंदा आर्यन्स गोविंदा पथकानेही १० थरांच्या प्रयत्नाची तयारी केली आहे. सात थरांपर्यंत पोहोचलेली पथके आठ, आठ थरांची पथके नऊ, तर नऊ थरांचा अनुभव असलेली पथके १० थरांचे लक्ष्य गाठण्याच्या तयारीत आहेत. जयजवान पथक सकाळी जोगेश्वरीतील मानाच्या हंड्यांमध्ये सहभाग घेतल्यानंतर ठाण्यातील प्रमुख दहीहंड्यांकडे रवाना होईल.
हिरानंदानी परिसरातील हंडी विशेष आकर्षण असून, येथे ५१ लाख रुपयांपर्यंतची पारितोषिके आणि बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. जयजवान पथकात ६०० ते ७०० गोविंदा आणि त्यांच्यासोबत मोठ्या संख्येने समर्थक सहभागी होणार आहेत. दरम्यान, आर्यन्स पथकाने ठाण्यातील संस्कृती प्रतिष्ठान, अविनाश जाधव आणि स्वामी प्रतिष्ठानच्या दहीहंड्यांमध्ये १० थर रचण्याचे नियोजन आहे. पथकाने यापूर्वी २१ ते २२ वेळा नऊ थर यशस्वीपणे रचले आहेत.
माझगाव ताडवाडीचे पाच एक्के
माझगावच्या ताडवाडी येथील श्री दत्त क्रीडा मंडळाने सुरक्षेचा विचार करून सात थरांपर्यंत मर्यादित राहण्याचा निर्णय घेतला आहे. माझगाव ताडवाडी पथकाने विरार येथे आणि प्रो गोविंदामध्ये पाच एक्के लावून सर्वांचे लक्ष वेधले आहे.