

भाईंंदर : विकासाच्या नावाखाली पर्यावरणाची हानी होत असल्याचा गंभीर आरोप दहिसर-भाईंदर पश्चिम लिंक रोड प्रकल्पावर करण्यात येत आहे. बड्या बिल्डर आणि संस्थांच्या जमिनी वाचवण्यासाठी मूळ आराखडा बदलून रस्ता खाडी व दाट कांदळवनातून नेण्यात आल्याचे उघडकीस आल्याने संताप व्यक्त होत आहे.
वर्सोवा ते दहिसर पश्चिम किनारी मार्गाला जोडणारा आणि पुढे भाईंदरपर्यंत जाणारा सुमारे ४५ मीटर रुंदीचा लिंक रोड उभारला जात आहे. या प्रकल्पासाठी तब्बल ४५ हजार कांदळवन झाडे नष्ट होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. याशिवाय खारभूमी, तसेच पक्षी व जलचर प्राण्यांचे अधिवासही धोक्यात येणार आहेत. खाडी व कांदळवनातून रस्ता गेल्यास मच्छिमारांचा व्यवसाय उद्ध्वस्त होणार असल्याचा इशारा चारकोप येथील धीरज भंडारी व इतर मच्छीमारांनी दिला आहे.
दरम्यान, कृष्णा गुप्ता (सत्यकाम फाऊंडेशन) यांनी आरोप केला की, मूळ आराखड्यानुसार रस्ता काही बिल्डर व संस्थांच्या जमिनीतून जाणार होता. मात्र त्यांच्या हरकतीनंतर आराखडा बदलून रस्ता वळवण्यात आला. एलिव्हेटेड रस्ता करण्याचा पर्याय उपलब्ध असतानाही हजारो कोटींचे टेंडर आणि बिल्डरांना फायदा मिळावा यासाठीच हा निर्णय घेण्यात आला, असे त्यांनी म्हटले. मीठ उत्पादक शिलोत्री संघाचे अध्यक्ष अशोक पाटील यांनीही नाराजी व्यक्त करत सांगितले की, खाड्या आधीच सांडपाण्यामुळे प्रदूषित झाल्या आहेत. आता या प्रकल्पामुळे उरलेसुरले मीठ उत्पादन आणि स्थानिकांचा उदरनिर्वाह धोक्यात येणार आहे.
दहिसर ते भाईंदर लिंक रोडचा मूळ मार्ग राधास्वामी सत्संग व काही बिल्डरांच्या जमिनीतून जाणार होता. मात्र, त्यांच्या हरकतीनंतर शासनाने आराखड्यात बदल केला. बड्या लोकांच्या जमिनी वाचवण्यासाठी कांदळवन आणि खाडी क्षेत्राचा बळी दिला जात आहे.
रोहित सुवर्णा, सामाजिक कार्यकर्ते
हरकतीनंतरच आराखड्यात बदल
एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, रस्त्याच्या आरक्षणाबाबत पालिकेने प्रक्रिया पूर्ण केली होती. मात्र, विकासक आणि संबंधित संस्थांच्या हरकतीनंतर शासन स्तरावर आराखड्यात बदल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे विकास आणि पर्यावरणमधील समतोलाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, स्थानिक नागरिक व पर्यावरणप्रेमींनी या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे.
आरोग्यावर परिणाम?
पर्यावरणप्रेमींच्या मते, कांदळवन हे किनारपट्टीचे नैसर्गिक ‘कवच’ असून ते पावसाचे व भरतीचे पाणी शोषून पूरस्थिती कमी करते. तसेच इतर झाडांच्या तुलनेत चारपट अधिक कार्बन शोषून घेते आणि पाण्यातील प्रदूषण कमी करण्यास मदत करते. गोराई येथील स्वीटसी हॅन्ड्रिक्स यांनी सांगितले की, कांदळवनाची मोठ्या प्रमाणावर तोड झाल्यास प्रदूषण वाढून नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होईल.