दहिसर, कांदिवली, दादर, पनवेल रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट; अमृत भारत स्टेशन योजनेत आणखी चार स्थानकांचा समावेश
मुंबई : अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत देशभरातील रेल्वे स्थानकांचा चेहरामोहरा बदलण्यात येत आहे. या योजनेच्या यादीत मुंबईतील आणखी चार रेल्वे स्थानकांची भर पडली आहे. यामध्ये मध्य रेल्वे मार्गावरील दादर, हार्बर मार्गावरील पनवेल आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील कांदिवली आणि दहिसर या रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे काही वर्षांत चार स्थानकांचाही कायापालट होणार आहे.
रेल्वे मंत्रालयाने अमृत भारत स्टेशन योजना केंद्र सरकारच्या वतीने राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेत देशभरातील १ हजार ३२४ रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. राज्यातील १२८ रेल्वे स्थानकांचा या यादीत समावेश झाला आहे. या योजनेनुसार नुकतेच या यादीत मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील पनवेल आणि मुख्य मार्गावरील दादर रेल्वे स्थानकांची भर पडली आहे. त्याचप्रमाणे पश्चिम रेल्वे मार्गावरील कांदिवली आणि दहिसर या दोन रेल्वे स्थानकांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे. योजनेत मास्टर प्लॅन तयार करणे आणि स्टेशनवरील सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी टप्प्याटप्प्याने त्यांची अंमलबजावणी करणे समाविष्ट आहे. यामध्ये प्रवासी क्षेत्र, शौचालये, लिफ्ट/एस्कलेटर, स्वच्छता, वाय-फाय, स्थानिक उत्पादनांसाठी किऑस्क, 'एक स्थानक एक उत्पादन', माहिती प्रणाली, एक्झिक्युटिव्ह लाउंज इत्यादीद्वारे स्थानकावरील गरज लक्षात घेतल्या जाणार आहेत.