

भाईंंदर : मीरा-भाईंदरमधून मुंबईच्या दिशेने प्रवास करणाऱ्या हजारो नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रो मार्गिका क्रमांक ९ च्या अंतिम टप्प्याचे सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित मार्गावर प्रत्यक्ष मेट्रो ट्रेनची यशस्वी चाचणी सुरू करण्यात आली आहे. सर्व तांत्रिक आणि प्रशासकीय परवानग्या वेळेत मिळाल्यास वर्षअखेरीस संपूर्ण मार्गिका प्रवाशांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.
मीरा-भाईंदरकरांचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर करण्यासाठी राज्य शासनामार्फत मेट्रो मार्गिका क्रमांक ९ उभारण्यात येत आहे. या मार्गिकेच्या पहिल्या टप्प्यात दहिसर ते काशिगाव दरम्यानची मेट्रो सेवा एप्रिल महिन्यात सुरू करण्यात आली होती. या सेवेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, दररोज सुमारे ३५ ते ४० हजार प्रवासी या मार्गिकेचा लाभ घेत आहेत. आता काशिगाव ते नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान या अंतिम टप्प्यातील कामे अंतिम अवस्थेत पोहोचली असून, मंगळवारी या मार्गावर मेट्रो ट्रेनची यशस्वी चाचणी घेण्यात आली.
सध्या या टप्प्यात विद्युत वाहिन्या अंथरणे, स्थानक परिसराचा विकास तसेच अन्य तांत्रिक कामे वेगाने सुरू आहेत. भाईंदर पश्चिमेतील शहीद भगतसिंग गार्डन मेट्रो स्थानकाच्या बांधकामात उच्चदाब वीजवाहिनीमुळे तांत्रिक अडथळा निर्माण झाला होता. दहिसर ते भाईंदर पश्चिम असा मेट्रो मार्गिका क्रमांक ९ चा एकूण १०.४१ किलोमीटरचा मार्ग असून, त्यावर आठ स्थानके आहेत. पहिल्या टप्प्यात दहिसर, पांडुरंगवाडी, मिरागाव आणि काशिगाव ही चार स्थानके (सुमारे ६ किलोमीटर) सुरू करण्यात आली आहेत. दुसऱ्या टप्प्यात साईबाबा नगर, मेडतिया नगर, शहीद भगतसिंग गार्डन आणि नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान ही चार स्थानके (४.४१ किलोमीटर) प्रवाशांसाठी खुली करण्यात येणार आहेत.
वाहतुकीवरील ताण कमी होणार
एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर आवश्यक शासकीय परवानग्या मिळवून वर्षअखेरीस अंतिम टप्पा नागरिकांसाठी खुला करण्याचे नियोजन आहे. या मार्गिकेमुळे मीरा-भाईंदर ते मुंबई दरम्यानच्या रस्ते वाहतुकीवरील ताण कमी होण्याबरोबरच प्रवाशांचा प्रवासाचा वेळही मोठ्या प्रमाणात वाचणार आहे.