दहिसरकरांचा वळसा वाचणार; बोरिवलीच्या श्रीकृष्ण उड्डाणपुलाच्या कामाचा मार्ग मोकळा

संजय गांधी उद्यानाकडील बाजूसाठी वनविभागाची परवानगी मिळवण्याकरिता पाठपुरावा सुरू होता.
दहिसरकरांचा वळसा वाचणार; बोरिवलीच्या श्रीकृष्ण उड्डाणपुलाच्या कामाचा मार्ग मोकळा
Published on

मुंबई : बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या हद्दीतील श्रीकृष्ण उड्डाणपुलाच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. वनविभागाने कामाला परवानगी दिल्याने दुसऱ्या टप्प्यातील ११.३० मीटरचे काम लवकरच सुरू होणार आहे. श्रीकृष्ण उड्डाणपूल दहिसर, बोरिवलीकरांच्या सेवेत आल्यानंतर चार किमीचा वळसा वाचणार आहे.

मुंबई महापालिकेच्या पूल विभागातर्फे बोरिवली पूर्वेकडील श्रीकृष्ण नगर येथे दहिसर नदीवरील पूलाचे काम सुरू आहे. या पुलाचे काम सुरू असल्यामुळे या परिसरातील नागरिकांना चार किमीचा वळसा घालून जावे लागत होते. त्यामुळे या पुलाची एक बाजू मार्च महिन्यात खुली करण्यात आली होती. मात्र पुलाच्या उर्वरित बाजूसाठी वनविभागाची परवानगी लागणार असल्यामुळे या पुलाचे काम रखडले होते. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या (नॅशनल पार्क) हद्दीत हा पूल येत असल्याने परवानगी मिळण्यासाठी उशीर झाला. पुलाच्या अर्ध्या भागाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले होते. मात्र या पुलाच्या दुसऱ्या भागासाठी परवानग्यांची आवश्यकता होती. त्यामुळे दुसऱ्या भागाचे काम रखडले होते.

संजय गांधी उद्यानाकडील बाजूसाठी वनविभागाची परवानगी मिळवण्याकरिता पाठपुरावा सुरू होता. त्यानुसार वनविभागाच्या हद्दीतील ०.०७२८ हेक्टर वनजमिनीच्या वापरासाठी भारत सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने ऑगस्ट २०२३ मध्ये मंजुरी दिली होती. नागपूर प्रादेशिक कार्यालयाने हे परवानगीचे पत्र दिले होते. मात्र राज्य सरकारच्या पश्चिम वन्यजीव क्षेत्र विभागाची परवानगी मिळणे बाकी होते. ती परवानगी डिसेंबरमध्ये मिळाली.

logo
marathi.freepressjournal.in