मुंबई : दर आठवड्यात एक दिवस स्वच्छता मोहीम न राबवता आता मुंबईची स्वच्छता रोज करण्यात येणार आहे. या मोहिमेत पदपथ मुक्तीसाठी फेरीवाला खाद्यपदार्थ विक्रेते हटाव मोहीम, बेकायदा पार्किंगापासून रस्ते मुक्त करणे अशा प्रकारे स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. आपल्या वॉर्डात स्वच्छता होते की नाही याची तपासणी संबंधित सहायक आयुक्त व उपायुक्तांनी रोज सकाळी ७ ते ११ दरम्यान पहाणी करावी. तसेच सहायक आयुक्तांना नियुक्ती केलेल्या नोडल अधिकाऱ्यांनी रोजचा अहवाल सादर करावा, असे आदेश पालिका प्रशासनाने दिले आहेत. संपूर्ण स्वच्छ मुंबईसाठी मुंबई महापालिकेची नवी नियमावली शुक्रवारी जारी केली आहे.
स्वच्छ व सुंदर मुंबईसाठी कचरा मुक्त मुंबई यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ३ डिसेंबर रोजी डीप क्लिनिंग मोहीमेचा शुभारंभ झाला. परंतु आठवड्यात एक दिवस स्वच्छता न करता रोज स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. पालिकेच्या सात झोनमध्ये किमान एक वॉर्ड या उपक्रमात सहभागी करून घेण्यात येणार आहे. सकाळी ६ ते दुपारी २ या वेळेत हा उपक्रम राबवला जाणार आहे.
अशी आहे नियमावली
- सोमवार ते शुक्रवार या कालावधीत सहाय्यक आयुक्त व कार्यकारी अभियंत्यांनी परिसरातील सद्यस्थितीचा आढावा घेऊन बेवारस वाहने हटविणे, सार्वजनिक ठिकाण, अनधिकृत बांधकामे, धोकादायक झाडे, बॅनर व फलक हटविण्याच्या नोटीस बजावून संबंधितांना योग्य त्या सूचना कळविणे.
- विभागातील चौपाटी नीटनेटके व स्वच्छ ठेवण्यात येतील. सकाळी ६.३० वाजल्यापासून रस्ते स्वच्छ करून ब्रशिग करावे. परिणामी होणारी धूळ व गाळ व पाण्याच्या तळ्यांसह गोळा करून नंतर फायरॅक्स/ डिस्लजिंग/ पाण्याच्या टँकरने धुतले जातील.
- संपूर्ण स्वच्छता मोहिमेच्या ठिकाणाहून संकलित केलेल्या अनावश्यक साहित्याची स्वतंत्र वाहनादवारे विल्हेवाट लावली जाईल. रस्त्यालगतच्या भिंती, ज्यांचे सुशोभीकरण करता येईल, ते सौंदर्यविषयक डिझाइन्स आणि सामाजिक संदेशांसह (विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी ठरविलेल्या थीमवर आधारित) रंगवले जातील.