मेट्रो ३च्या खोदकामात खडक फोडताना ब्लास्ट मंत्रालयाच्या इमारतीच्या काचांचे तसेच आसपासच्या वाहनांचे नुकसान

घटनेच्या अभ्यासानंतर काम सुरु करणार - मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन
मेट्रो ३च्या खोदकामात खडक फोडताना ब्लास्ट मंत्रालयाच्या इमारतीच्या काचांचे तसेच आसपासच्या वाहनांचे नुकसान

मुंबई : मेट्रो रेल-३ चे मंत्रालय ते विधानभवन येथे भुयारी मार्गाचे खोदकाम सुरू असताना, कठीण दगड फोडताना गुरुवारी दुपारी ब्लास्ट झाला. यामुळे विधानभवन परिसरात उभ्या असलेल्या वाहनांचे नुकसान झाले असून मंत्रालय इमारतीच्या काचांना तडा गेल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात काही वेळ भीतीचे वातावरण पसरले होते. दरम्यान, या घटनेनंतर खोदकाम थांबवण्यात आले असून घटनेच्या अभ्यासानंतर पुन्हा काम सुरू करण्यात येईल, मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या वतीने सांगण्यात आले.

मुंबई मेट्रो रेल-३ चे काम वेगाने सुरू असून गुरुवारी दुपारी मंत्रालय ते विधानभवन येथे भुयारी मार्गाजवळील बाहेर पडणाऱ्या प्रवेशद्वाराजवळ खोदकाम सुरू होते. कठीण दगड फोडण्यासाठी सुरुंगाचे स्फोट करण्यात येत असताना ब्लास्ट झाला. जोरदार आवाज झाल्याने काय झाले, हे न कळल्याने लोकांमध्ये काही वेळ भीतीचे वातावरण पसरले होते. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. तसेच या घटनेचा स्थानिक पोलीस व मुंबई अग्निशमन दलाचे अधिकारी तपास करत आहेत.

मंत्रालय ते विधानभवन भुयारी मार्गाच्या कामादरम्यान कठीण खडक फोडण्यासाठी नियंत्रित ब्लास्टिंग केले जात आहे. काही दिवसांपासून ब्लास्टिंगचे काम कोणत्याही अडचणीशिवाय सुरू आहे. मात्र गुरुवारी या कामादरम्यान मंत्रालयाच्या काही खिडक्यांचे नुकसान झाले. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन हे काम पूर्ण जबाबदारीने करीत आहे. सध्या मंत्रालयाजवळील भुयारी मार्गावर नियंत्रित ब्लास्टिंगचे काम थांबवण्यात आले आहे. तसेच या कामाचा आढावा घेत ब्लास्टिंगदरम्यान झालेल्या घटनेच्या कारणांचा अभ्यास करून सुधारणेनंतरच काम पुन्हा सुरू केले जाईल, असे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या प्रवक्त्याने सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in