परळ टीटी पुलावर वाहतूककोंडीचा धोका!पावसाळ्यापूर्वीच दुचाकी वाहनांना बंदी घातल्याने चालकांमध्ये नाराजी

पुलाच्या दुरुस्तीचा शुभारंभ ऑक्टोबर महिन्यात; १६ कोटींचा खर्च
परळ टीटी पुलावर वाहतूककोंडीचा धोका!पावसाळ्यापूर्वीच दुचाकी वाहनांना बंदी घातल्याने चालकांमध्ये नाराजी

गिरीश चित्रे/मुंबई


मुंबईत ५०हून अधिक पुलांचे काम सुरू असून परळ टीटी पूल १ जूनपासून दुचाकी व अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. पुलाखाली दरवर्षी पावसाळ्यात पाणी जमा होत असल्याने यंदाच्या पावसाळ्यात पुलाखालून दुचाकी घेऊन जाणे चालकांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. दरम्यान, गुरुवार, १ जूनपासून अवजड वाहनांना बंदी घालण्यासाठी अडीच मीटरपेक्षा अधिक उंचीचे हाईट बॅरियर बसवण्याचे काम सुरू केले आहे. तसेच पुलावरील दोन्ही बाजुकडील एक्स्पांशन जाईट खराख झाल्याने ते काढण्यात येणार असून पुलाच्या दुरुस्तीसाठी १६ कोटी रुपये खर्चणार करण्यात येणार आहे. वाहतूक पोलिसांची परवानगी मिळाल्याने पूल दुचाकी व अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

दरवर्षी पावसाळ्यात हिंदमाता किंग सर्कल, परळ हे भाग पाण्याखाली जातात. परंतु मुंबई महापालिका प्रशासनाने पाणी उपसा करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे गेल्या वर्षी या भागात पाणी साचून राहिले नाही. मात्र हलक्या पावसात परळ पुलाखाली वाहतूककोंडी ही वाहन चालकांसाठी मोठी डोकेदुखी ठरते. त्यात यंदा तर परळ टीटी पूल दुचाकी व अवजड वाहनांसाठी बंद केल्याने विशेष करून दुचाकीस्वारांची डोकेदुखी वाढणार असल्याचे मत दादर येथील रहिवासी महेश सुर्वे यांनी व्यक्त केले.

परळ टीटी उड्डाणपुलावर दोन्ही बाजूला १३ अधिक १३ असे एकूण २६ एक्सपांश असून ते खराब झाले आहेत. त्यामुळे अवजड वाहने जाऊन अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच दुचाकीस्वाराचा वाहनांवर वेग मर्यादा ठेवत नाही. त्यात उड्डाणपुलावरील एक्सपांश खराब झाल्याने दुचाकी बंद पडली आणि मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली, तर अपघात होण्याची शक्यता अधिक असल्याने दुचाकींना बंदी घालण्यात आली आहे. पुलावर जुन्या मॅथोलॉजिप्रमाणे १० मीटर वर एक्सपांश आहेत. मात्र एक्सपांश खराब झाल्याने ते काढून टाकण्यात येणार आहेत. तसेच पुलाच्या मजबुतीकरणाचे काम ऑक्टोबरपासून हाती घेण्यात येईल, अशी माहिती पालिकेच्या पूल विभागाचे प्रमुख अभियंता संजय कौडण्यपूरे यांनी सांगितले. पावसाळ्यात कुठलेही काम करणे शक्य नाही. त्यामुळे परळ टीटी पुलाचे काम पावसाळ्यानंतर सुरू करण्यात येईल, असे ही त्यांनी स्पष्ट केले.

फक्त रात्रीच्या वेळी काम

वाहनचालकांची गैरसोय होऊ नये म्हणून सध्या फक्त रात्रीच्या वेळेत या पुलावर दुरुस्ती आणि देखभालीचे काम करण्यात येत आहे. रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेतच वाहतूक पोलिसांच्या सूचनेनुसार याठिकाणी खड्डे भरणे आणि सांधे भरण्याचे काम सुरू आहे.

मजबुतीकरणासाठी पूल बंदच!

पावसाळ्यात कुठलेही काम करणे शक्य नाही. लहान कामे ड्राय स्पेल मध्ये करणे शक्य होईल तेवढी करण्यात येतील. परंतु पुलाच्या मजबुतीकरण पावसाळ्यानंतर शक्य होईल. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात काम सुरू केल्यापासून पुढील काही महिने पूल वाहतुकीसाठी पूर्णतः बंद राहील.

- संजय कौडण्यपूरे, मुख्य अभियंता, पूल विभाग

पावसाळ्यात डोकेदुखी वाढणार!

परळ टीटी उड्डाणपुलावरुन ये-जा करताना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यात ऐन पावसाळ्याच्या तोंडावर पूल दुचाकीस्वारांसाठी बंद केल्याने पुलाखाली पाणी साचल्याने हाल होणार आहे. मुंबई महापालिका प्रशासनाने यावर तोडगा काढावा. मी काळाचौकी येथे राहत असून भांडुप येथे रोज कामानिमित्त दुचाकीद्वारे ये-जा करावी लागते. मात्र पावसाळ्यात दुचाकीस्वारांची डोकेदुखी वाढणार आहे.
- संदीप सागवेकर, काळाचौकी

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in