
मुंबई : डोंगरी येथून विदेशी नागरिकासह दोघांना डोंगरी पोलिसांच्या एका विशेष पथकाने अटक केली. या दोघांकडून पोलिसांकडून ५०० ग्रॅम वजनाचे एमडी, ८० ग्रॅम चरस, एक गावठी कट्टा, एक एअर पिस्तूल, चार जिवंत काडतुसे, १२ पॅकेट्स छर्रे, एक तलवार, एक चाकू, एक वजनकाटा, २६ मोबाईल, तीन ॲॅप्पल कंपनीचे टॅब, एक मॅकबुक, लॅपटॉप आणि साडेतीन लाखांची कॅश असा सुमारे ४७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत कारवाई करण्यात आली असून अटकेनंतर या दोघांनाही लोकल कोर्टात पोलीस कोठडी सुनावली आहे.
डोंगरी येथील चिंचबंदर क्रॉस लेन, अशरफी मंजिल इमारतीमध्ये काहीजण ड्रग्जची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीनंतर पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. त्याच्या चौकशीतून त्याच्या नायजेरियन सहकाऱ्याचे नाव समोर आले. त्यानंतर या पथकाने मीरारोड येथून एका नायजेरियन नागरिकाला अटक केली. त्यांच्या राहत्या घरी पोलिसांनी छापा टाकून ३० लाखांचा एमडी, चार लाखांचे ८० ग्रॅम चरस, घातक शस्त्रे, साडेतीन लाखांची कॅश, मोबाईल आदी ४७ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. या दोघांविरुद्ध एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत. त्यांनी ते ड्रग्ज आणि घातक शस्त्रे कोठून आणले. या शस्त्रांचा कुठल्या गुन्ह्यांत वापर झाला का किंवा होणार होता का, याचा पोलीस तपास करत आहेत.