

पणजी : कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमचा जवळचा साथीदार आणि ड्रग्ज सिंडिकेटचा प्रमुख दानिश मर्चंट उर्फ दानिश चिकना याला गोव्यातून अटक करण्यात आली आहे. नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) मुंबईच्या पथकाने ही कारवाई केली असून, या अटकेमुळे दाऊदच्या ड्रग्ज नेटवर्कला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
एनसीबीच्या माहितीनुसार, दानिश चिकना मुंबईतील डोंगरी परिसरात ड्रग्ज फॅक्टरी चालवत होता आणि देशभरातील ड्रग्ज नेटवर्कचे व्यवस्थापन करत होता. त्याचे नाव यापूर्वीही अनेक वेळा अंमली पदार्थांच्या व्यापारात आले होते.
एनसीबीने २०१९ मध्ये डोंगरीतील दाऊदच्या ड्रग फॅक्टरीवर छापा टाकून कोट्यवधी रुपयांची ड्रग्ज जप्त केली होती. ही फॅक्टरी भाजीपाला दुकानाच्या आडून चालवली जात होती. त्यावेळी दानिश चिकनाला राजस्थानमधून अटक करण्यात आली होता. काही काळ तुरुंगवास भोगल्यानंतर तो बाहेर आला आणि पुन्हा ड्रग्ज व्यापारात सक्रिय झाला.
स्रोतांच्या माहितीनुसार, दानिश चिकना हा दाऊदचा जुना साथीदार युसुफ चिकना याचा मोठा मुलगा आहे. दाऊद आणि युसुफ या दोघांशी त्याचे घट्ट संबंध असल्याचे तपास यंत्रणांनी स्पष्ट केले आहे. दानिश गोव्यात हॉटेलमध्ये लपल्याची माहिती मिळाल्यानंतर एनसीबीने अचानक धाड टाकून त्याला ताब्यात घेतले.
