दसऱ्यानिमित्त झेंडू फुलांच्या किंमती शंभरी पार

आंब्याच्या पानाची तयार तोरणे ३० ते ५० रुपये; ग्राहकांची बाजारात गर्दी
दसऱ्यानिमित्त झेंडू फुलांच्या किंमती शंभरी पार

विजयादशमी अर्थात दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त. दसऱ्याला आपट्याची पाने, आंब्याच्या डहाळ्या, झेंडूची फुले यांना विशेष महत्त्व असल्याने या सामग्रीच्या खरेदीसाठी मुंबईसह सर्व शहरातील प्रमुख बाजारात ग्राहकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. किरकोळ बाजारात झेंडूचे दर ५० ते ६० रुपयांवरून प्रती किलो १०० ते १४० रुपयांपर्यंत पोहचले आहे. तर आंब्याच्या पानाची तयार तोरणे ३० ते ५० रुपयांनी विकले जात आहेत. कोरोनानंतर सर्वत्र पहिल्यांदाच बाजारपेठा फुलल्याने दरात २५ ते ३० टक्यांनी वाढ झाली आहे.

धन, धान्य, ज्ञान आणि सोन्याचे प्रतीक म्हणून आपट्याची पाने, पाटी-पुस्तके अर्थात सरस्वती देवीची आणि शस्त्रास्त्रांची दसऱ्याच्या खंडेनवमीला पूजा करण्यात येते. या दिवशी सोने लुटण्याची म्हणजेच आपट्याची पाने मित्रपरिवाराला वाटून शुभेच्छा देण्याची प्रथा आहे. यंदा साजऱ्या होणाऱ्या दसरा सणासाठी नागरिकांची गर्दी बाजारपेठांमध्ये दिसत आहे. झेंडू, आंब्याच्या डहाळ्या, आपट्याची पाने खरेदीसाठी ग्राहक गर्दी करत आहेत. बाजारात पिवळ्या व केशरी रंगाच्या झेंडूच्या फुलांची जास्त चलती आहे. सणासुदीच्या दिवसांव्यतिरिक्त सरासरी ६० रुपये किलो दराने झेंडूची विक्री होते. मात्र नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी यांसारख्या सणाला धार्मिक कार्यासाठी लागणाऱ्या फुलांचे भाव चांगलेच वधारतात असे फुलविक्रेते मनोहर झेंडे यांनी सांगितले.

किरकोळ बाजारात फुलांचे दर (प्रतिकिलो)

झेंडू - १०० ते १५० रुपये

शेवंती - १६० ते १८० रुपये

लहान झेंडू - ९० ते ११० रुपये

तोरण - ६० ते ८० रुपये (प्रतिमीटर)

आपट्याच्या पानांची जुडी - २० ते ३० रुपये

सोनेखरेदीचा वाढता ट्रेंड

दसऱ्याच्या मुहूर्तावर अनेक जण सोनेखरेदीला पसंती देतात. सध्या सोन्याचा भाव साधारण ५१ हजार रुपये प्रतितोळा झाला आहे. सणानिमित्त शुभ कार्य म्हणून गुंतवणुकीचा एक प्रकार म्हणजे एक ग्रॅम सोने हा सध्या ट्रेंड आहे. यासाठी विविध ज्वेलर्समध्ये कमी वजनाच्या दागिन्यांची नवी व्हरायटी सध्या ग्राहकांसाठी उपलब्ध आहे. चांदीलाही चांगली मागणी आहे. हिऱ्याच्या दागिन्यांसाठीही व्यावसायिकांनी आकर्षक सवलती देऊ केल्या आहेत.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in