सूनेनं केली सासऱ्याच्या घरात चोरी, मामेभावासोबत केलं परफेक्ट प्लॅनिंग, तीन लाखांची रोकड चोरली

मामेभावाला पैश्यांची गरज आहे म्हणून सासरच्या घरातील दागिने व रोख चोरणाऱ्या सुनेला तिच्या मामेभावासह पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
चोरी
चोरीप्रातिनिधिक फोटो

विशेष प्रतिनिधी

मुंबई: मामेभावाला पैश्यांची गरज आहे म्हणून सासरच्या घरातील दागिने व रोख चोरणाऱ्या सुनेला तिच्या मामेभावासह पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत . त्यापैकी दागिने व रोख असा १ लाख ९१ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे . 

भाईंदर पश्चिमेच्या भोला नगर झोपडपट्टीत तळ मजल्यावर शालू अमरजित बोध ही महिला आपल्या पतीसह राहते, तर वरच्या मजल्यावर तिचे सासरे राहतात. सासऱ्याच्या घरातून कपाटातील रोख व दागिने असा ३ लाख ८९ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची घटना २८ फेब्रुवारी रोजी घडली होती. त्या प्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता . 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत नाईकवाडी, गुन्हे निरीक्षक विवेक सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक माणिकराव कतुरे, उपनिरीक्षक प्रसाद गोवले सह रवींद्र भालेराव, राजेश श्रीवास्तव , किरण पी.  पवार  व किरण आर . पवार , सुशील पवार , रामनाथ शिंदे , संजय चव्हाण , सलमान पटवे , जयप्रकाश जाधव यांच्या पथकाने तपास सुरु केला.  तपासात सासऱ्याच्या कपाटातून केवळ सासूचे दागिने चोरीला गेले होते . परंतु सून शालू हिचे दागिने मात्र चोरीला गेले नव्हते . तसेच कुठेही टाळे तोडल्याचा प्रकार नव्हता .त्यामुळे पोलिसांना संशय आला आणि त्यांनी घरातील लोकांची चौकशी सुरु केली .तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले . सीसीटीव्ही मध्ये शालू चा मामेभाऊ रजत श्यामलाल बिडलान आढळून आला . पोलिसांनी शालू कडे चौकशी सुरु केली . त्यात तिच्या आईने देखील मुलीचा गुन्हा पाठीशी न घालता पोलिसांना सहकार्य केले . मामाच्या मुलास पैश्यांची गरज होती म्हणून शालू हिने सासूचे दागिने आणि रोख चोरल्याचे निष्पन्न झाले . पोलिसांनी शालू आणि रजत ह्या दोघांना अटक केली . तसेच चौकशीत १ लाख ९१ हजार ५०० रुपयांचे दागिने आणि रोख असा मुद्देमाल जप्त केला आहे . भाईंदर पोलीस अधिक तपास करत आहेत . 

logo
marathi.freepressjournal.in