
स्वित्झर्लंडमधील दावोस (Davos 2023) येथे जागतिक आर्थिक परिषदेला सुरुवात झाली आहे. या परिषदेच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्राने विविध कंपन्यांसोबत अंदाजे ४५ हजार ७०० कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले. या करारामुळे राज्यात सुमारे १० हजार रोजगार उपलब्ध होणार असल्याची माहिती राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेदेखील उपस्थित होते. त्यांच्याच प्रमुख उपस्थितीमध्ये विविध कंपन्यांसमवेत सामंजस्य करार करण्यात आले. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
या करारामध्ये ग्रीनको एनर्जी प्रोजेक्ट्सची १२ हजार कोटींची गुंतवणूक, बर्किशायर हॅथवे होम सर्व्हीसेसची १६ हजार कोटींची गुंतवणूक, आसीपी इन्व्हेस्टमेंट इंडस् कॅपिटल १६ हजार कोटी, रुखी फूड्स २५० कोटी, निप्रो फार्मा पॅकेजिंग इंडिया प्रा. लिमिटेड कंपनीची सुमारे १६५० कोटी रुपयांच्या सामंजस्य करारांचा समावेश आहे. यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मिती होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून व्यक्त करण्यात आला. यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, एमआयडीसी मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन शर्मा, श्रे एरेन, आशीष नवडे, स्टीफन आदी उपस्थित होते.