

मुंबई : राज्याचे राज्यपाल तथा कुलपती जिष्णू देव वर्मा यांच्या आदेशानुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणेरे येथे प्रा. डॉ. राजनिश कमलाकर कामत यांनी गुरुवारी कार्यवाह कुलगुरू म्हणून पदभार स्वीकारला. त्यांच्या नियुक्तीमुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक, संशोधन आणि प्रशासकीय कार्याला नवी दिशा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
प्रा. (डॉ.) कामत हे उच्च शिक्षण क्षेत्रातील एक प्रतिष्ठित व अनुभवी शैक्षणिक नेते असून त्यांना २८ वर्षांहून अधिक कालावधीचा अध्यापन, संशोधन व प्रशासनाचा अनुभव आहे. सध्या ते डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ, मुंबईचे कुलगुरू म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे विज्ञान व तंत्रज्ञान संकुलाचे अधिष्ठाता तसेच संगणक विज्ञान विभागप्रमुख म्हणून महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.
या विद्यापीठांमध्ये सांभाळली जबाबदारी
विशेष म्हणजे, त्यांनी यापूर्वी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर तसेच सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, आर्किटेक्चर अँड डिझाइन (डी-नोवो दर्जा प्राप्त अभिमत विद्यापीठ) येथे कार्यवाह कुलगुरू म्हणून यशस्वीपणे काम पाहिले आहे. या दोन्ही संस्थांमध्ये त्यांनी शैक्षणिक गुणवत्ता, प्रशासनिक कार्यक्षमता आणि नवोन्मेषी उपक्रमांना चालना दिली होती.