विद्यार्थ्यांची कागदपत्रे सादर करण्यास महाविद्यालयांना अखेरची मुदत; तर विद्यार्थ्यांचे प्रवेश करणार रद्द

मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पात्रता आणि नावनोंदणी संबंधातील कागदपत्रे येत्या ८ दिवसात विहित शुल्कासह विद्यापीठाकडे जमा करण्याचे आवाहन मुंबई विद्यापीठामार्फत करण्यात आले आहे.
Mumbai University
संग्रहित छायाचित्र
Published on

मुंबई : मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थांमध्ये विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पात्रता आणि नावनोंदणी संबंधातील कागदपत्रे येत्या ८ दिवसात विहित शुल्कासह विद्यापीठाकडे जमा करण्याचे आवाहन मुंबई विद्यापीठामार्फत करण्यात आले आहे.

३० सप्टेंबर २०२४ ही शुल्कासह कागदपत्रे जमा करण्याची अंतिम मुदत उलटूनही अनेक महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांच्या प्रवेशासंदर्भातील कागदपत्रे अद्याप विद्यापीठाकडे जमा केलेली नाहीत. येत्या ८ दिवसात विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेची कागदपत्रे विद्यापीठाकडे तात्काळ जमा करण्याचे निर्देश विद्यापीठाने दिले आहेत. मुदतीमध्ये कागदपत्रे सादर न केल्यास विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या शैक्षणिक नुकसानाची संपूर्ण जबाबदारी विद्यापीठाने संबंधित महाविद्यालयांवर टाकली आहे.

मुंबई विद्यापीठामार्फत प्रत्येक शैक्षणिक वर्षासाठी विविध अभ्यासक्रमांना प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रियेची कागदपत्रे विहित मुदतीत जमा करण्यासाठी परिपत्रानुसार सर्व संलग्नित महाविद्यालयांना कळविण्यात येते. प्रथम वर्षात प्रवेश घेतल्यानंतर त्याची नाव नोंदणी व पात्रतेबाबतचे दस्तऐवज त्याच वर्षात जमा करणे आवश्यक असतानाही अनेक महाविद्यालयांमार्फत विहित मुदतीत कागदपत्रे सादर केली जात नाहीत.

शैक्षणिक वर्ष २०२०-२१, २०२१-२२ आणि २०२२-२३ या वर्षात विविध अभ्यासक्रमांना प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचे पात्रतेसंबंधित अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. अशा प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी विद्यापीठामार्फत सुरुवातीला १५ फेब्रुवारी २०२४ या तारखेपर्यंत विहित शुल्कासह कागदपत्रे जमा करण्यासाठी कळविण्यात आले होते. त्यानंतर ३० सप्टेंबर २०२४ ही मुदतवाढ देण्यात आली होती.

या मुदतीनंतरही अनेक महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांची कागदपत्रे विद्यापीठाकडे सादर केलेली नाहीत. कागदपत्रे मुदतीत जमा न केलेल्या विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण आणि नोकरीच्या संधीमध्ये बाधा निर्माण होतात आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. महाविद्यालयांच्या ढिसाळ कारभाराचा फटका विद्यार्थ्यांना बसत असल्याने विद्यापीठाणे विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी महाविद्यालयांवर टाकली आहे.

...तर विद्यार्थ्यांचे प्रवेश करणार रद्द

वारंवार सूचना देऊनही विहीत कालावधीत शुल्कासह ज्या महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे पात्रता आणि नाव नोंदणी कागदपत्रे विद्यापीठाकडे जमा केली नाहीत, अशा महाविद्यालयांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. तसेच अशा विद्यार्थ्यांचे प्रवेश विद्यापीठामार्फत रद्द केले जातील याची सर्वस्व जबाबदारी संबधित महाविद्यालांची असेल, असे विद्यापीठामार्फत सांगण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in