
मुंबई : कांदिवली परिसरातून साडेचार वर्षांच्या मुलीचे अपहरण करून नंतर तिच्या विक्रीचा सौदा फसल्यावर तिला सोडून पलायन करणाऱ्या एका आरोपीला तब्बल आठ महिन्यानंतर समतानगर पोलिसांनी अटक केली. इरफान फुरकान खान असे या २६ वर्षीय आरोपीचे नाव असून अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली होती.
मुलीचा खरेदी-विक्रीचा सौदा रद्द झाल्याने त्याने मुलीला पुन्हा कांदिवली परिसरात सोडून पलायन केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. ४३ वर्षांचे तक्रारदार कांदिवलीतील पोयसर परिसरात राहत असून ते चालक म्हणून काम करतात. त्यांना १५ वर्षांचा एक मुलगा आणि साडेचार वर्षांची एक मुलगी आहे. २६ फेब्रुवारी २०२३ रोजी रविवारची सुट्टी असल्याने त्यांची मुलगी परिसरातील मुलांसोबत खेळत होती. सायंकाळी चार वाजता आईने मुलीचा शोध घेतला असता, ती कुठेच दिसली नाही. तिच्यासोबत खेळणाऱ्या मुलांनाही काहीच माहिती नव्हती. यानंतर मुलीचा सर्वत्र शोध घेतला असता, ती कुठेच सापडली नाही. अखेर तिच्या वडिलांनी समतानगर पोलिसांना हा प्रकार सांगितला. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदविला होता.
मुलीचा शोध सुरू असतानाच काही तासांनी ही मुलगी त्याच परिसरात सापडली होती. मात्र तिचे अपहरण करणारा आरोपी न सापडल्याने ही केस बंद करण्यात आली होती. गेल्या महिन्यांत कुरारच्या हद्दीत अशाच प्रकारे घडलेल्या एका गुन्ह्यातील आरोपी इरफानने कांदिवलीतील गुन्हाही आपणच केल्याचे कबुल केले.
असा फसला प्लान
कांदिवलीतून अपहरण केल्यानंतर या मुलीला कुर्ला येथील लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्थानकात आणले होते. मात्र या मुलीचा खरेदी-विक्रीचा सौदा रद्द झाला होता. या मुलीसोबत जास्त काळ त्याला राहता येणार नाही. त्यामुळे तो तिला घेऊन पुन्हा कांदिवलीत आला होता. त्याने ती राहत असलेल्या परिसरात तिला सोडून पलायन केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.