मुंबई : मुंबंईची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमधील गर्दीत धक्का लागून प्रवाशांचा खाली पडून झालेला मृत्यू, हा अपघातच आहे. त्याची जबाबदारी ही रेल्वे प्रशासनाची आहे, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने दिला. न्यायमूर्ती किशोर संत यांनी हा निर्वाळा देताना, रेल्वे प्रशासनाने मृत्यू झालेल्या प्रवाशाच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश रेल्वे मंत्रालयाला दिले.
लोकल ट्रेनने गोरेगाव ते कांदिवली असा प्रवास करत असताना विवेक शहा हा तरुण फुटबोर्डवर गर्दीचा धक्का लागून खाली कोसळला आणि गंभीर जखमी झाला. त्यात त्याचा मृत्यू झाला. विवेकच्या पालकांनी सुरुवातीला रेल्वे दावे न्यायाधिकरणाकडे भरपाईसाठी दावा केला. मात्र संबंधित घटना रेल्वे कायद्याच्या कलम १२३ (क) अंतर्गत अप्रिय घटनेच्या व्याख्येत मोडत नाही, असे स्पष्ट करत न्यायाधिकरणाने विवेकच्या पालकांचा दावा नाकारला.
या निर्णयाविरोधात विवेकच्या पालकांनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले. त्या अपिलावर न्यायमूर्ती किशोर संत यांच्यासमोर सुनावणी झाली. न्यायालयाने याचिकेची गंभीर दखल घेत, लोकल ट्रेनमधील गर्दीत धक्का लागून खाली पडणे हा अपघातच आहे, असे निरीक्षण नोंदवले. तसेच मुंबई हायकोर्टाने विवेकच्या पालकांना ४ लाखांची भरपाई देण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाला दिले. तसेच ही भरपाईची रक्कम पुढील तीन महिन्यात द्या, अशी तंबीही दिली.