अंबानी कुटुंबीयांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी

या धमकीनंतर रुग्णालयासह अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ निवासस्थानाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
अंबानी कुटुंबीयांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कुटुंबीयांना पुन्हा एकदा अज्ञात कॉलद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. तसेच रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयातही बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी डी. बी. मार्ग पोलिसांनी बॉम्बस्फोटासह जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे. अंबानी कुटुंबीयांना ऑगस्टमध्येही अशाच प्रकारे धमकी देण्यात आली होती. तीन महिन्यांतील ही दुसरी घटना असून या धमकीनंतर रुग्णालयासह अंबानी यांच्या ‘अँटिलिया’ निवासस्थानाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

ऑगस्ट महिन्यात रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन रुग्णालयासह अंबानी कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी गुन्हा नोंद होताच दहिसर येथून पोलिसांनी एका मनोरुग्ण व्यापाऱ्याला अटक केली होती. याच गुन्ह्यांत अलीकडेच या व्यापाऱ्याची विशेष सेशन कोर्टाने जामिनावर सुटका केली. याप्रकरणी पोलिसांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे. या गुन्ह्याचा स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी समांतर तपास करीत आहेत. धमकी देणाऱ्या आरोपीच्या अटकेसाठी दोन विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. हा कॉल कोठून आला आणि कोणी केला याबाबत प्राथमिक माहिती पोलिसांना समजली असून लवकरच या आरोपीला अटक केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

अंबानींना नुकतीच झेड प्लस सुरक्षा

केंद्रीय गृह मंत्रालयाने उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या सुरक्षेत नुकतीच वाढ केली आहे. गृह विभागाने त्यांना झेड प्लस श्रेणीची सुरक्षा प्रदान केली आहे. सुरक्षेचा खर्च मुकेश अंबानी करणार आहेत. हा खर्च दरमहा ४० ते ४५ लाख रुपये असणार आहे. यापूर्वी त्यांना झेड श्रेणीची सुरक्षा मिळाली होती.

रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात आला धमकीचा फोन

ही घटना ताजी असतानाच बुधवारी दुपारी एक वाजता रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात एका अज्ञात व्यक्तीने फोन केला. या व्यक्तीने रुग्णालयात बॉम्बस्फोट घडविण्याची धमकी देताना अंबानी कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली. या व्यक्तीने मुकेश अंबानींसह नीता अंबानी यांच्या नावाचा उल्लेख केला. या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनाने ही माहिती डी. बी. मार्ग पोलिसांना दिली. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in