माजी नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी

महिलेसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
माजी नगरसेवकाला जीवे मारण्याची धमकी

मुंबई : मनसेचे माजी नगरसेवक आणि शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे विभागप्रमुख परमेश्‍वर तुकाराम कदम यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी त्यांच्या तक्रार अर्जावरून पंतनगर पोलिसांनी करीमा मुजीब शहा ऊर्फ करीमा शेख, अक्रम अन्सारी आणि राधाकृष्ण हरिजन या तिघांविरुद्ध धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

माजी नगरसेवक परमेश्‍वर कदम हे २००७ साली मनसेच्या तिकीटावर निवडून आले होते. त्यानंतर ते सलग तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. सध्या ते एकनाथ शिंदे यांच्या गटाचे शिवसेनेचे शिवाजीनगर, मानखुर्द आणि घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघाचे विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. या परिसरात करीमा आणि अक्रम हे मोठ्या प्रमाणात अनधिकृत झोपड्या बांधून त्यांची विक्री करत होते. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध परमेश्‍वर कदम यांनी अनेकदा महानगरपालिकेत तक्रार केली होती. त्यामुळे त्यांनी बांधलेल्या झोपड्या मनपाने तोडून टाकल्या होत्या. त्यातून या दोघांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले होते. त्याचा त्यांच्या मनात राग ठेवून त्यांना करीमासह अक्रम यांच्याकडून सतत जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. कार्यालयात घुसून त्यांची हत्या करू, अशी धमकी दिली जात होती.

काही दिवसांपूर्वी परमेश्वर यांना ‘अरुण महाजनची जशी हत्या झाली, तशीच तुमची हत्या करू,’ अशी धमकी दिली जात होती. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या महिला कार्यकर्त्यांच्या घरी करीमा आणि राधाकृष्ण आले होते. यावेळी करीमाने तिची तडीपारची कारवाई संपली असून ती पुन्हा परिसरात येत आहे. तसेच त्यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी दिली होती. या धमक्यानंतर त्यांनी पंतनगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी या तिघांविरुद्ध जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे.

logo
marathi.freepressjournal.in