

मुंबई : मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला कॉल करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका तरुणीला आंबोली पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर तिला नोटीस देऊन सोडून देण्यात आले आहे. ही तरुणी मानसिक आजाराने त्रस्त असल्याचे तपासात उघडकीस आले आहे. बुधवारी सकाळी मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाला एका महिलेने कॉल केला. तिने नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट असल्याचे सांगून त्यासाठी शस्त्रे तयार असल्याची माहिती दिली. त्यानंतर तिने तिचा मोबाईल फोन बंद केला. पोलिसांनी तपास करून तरुणीला कांदिवली येथून ताब्यात घेतले व चौकशीअंती नोटीस देऊन सोडून दिले.