
मुंबई : मुंबईत मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू असून बांधकामांमुळे हवेची गुणवत्ता खालावली आहे. तर दुसरीकडे बांधकामांमुळे मुंबईत दररोज ८ हजार मेट्रिक टन डेब्रिज जमा होत असून डेब्रिजवर प्रक्रिया करण्यासाठी पालिका प्रशासनाकडे दहिसर व कल्याण येथे १२०० टनाचे दोन प्रक्रिया केंद्र आहेत. त्यामुळे उर्वरित डेब्रिजची विल्हेवाट लावणे हे मुंबई महापालिकेसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. दरम्यान, मुंबईत डेब्रिजची समस्या दूर करण्यासाठी या प्रक्रिया केंद्राची क्षमता वाढीवर पालिका प्रशासनाने भर दिला आहे.
मुंबई प्रेस क्लबमध्ये गुरुवारी ‘कन्स्ट्रशन अँड डिमोलेशन सेक्टर अँड एअर पोल्यूशन’ या विषयावर मान्यवरांची व्याख्याने आयोजित केली होती. यावेळी पालिकेचे उपायुक्त किरण दिघावकर, फुफ्फुसरोग तज्ज्ञ लान्सलॉट पिंटो, इंदूरमध्ये झिरो कचरा व्यवस्थापनासाठी काम करणारे राकेश कुमार, शाश्वत शहरांसाठी काम करणारे प्रयास गिरिया आदी उपस्थित होते.
मुंबईत दररोज सहा हजार मेट्रिक टन कचरा जमा होतो. पालिकेच्या नियोजनामुळे कचऱ्याची विल्हेवाट योग्य प्रकारे लावली जाते. ओला कचरा, सुका कचऱ्याबरोबरच बांधकामात निर्माण होणारे डेब्रिज टाकले जात असल्याने अशा कचऱ्याचा पुनर्वापर करणे शक्य होत नाही. डेब्रिज गोळा करण्यासाठी ‘डेब्रिज ऑन कॉल’ ही संकल्पना राबवली जाते. सध्या यासाठी शुल्क आकारले जात असले तरी हे शुल्क टप्प्याटप्प्याने कमी केले जाणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य, कंत्राटदार याचा वापर करतील आणि अनधिकृतपणे टाकल्या जाणाऱ्या डेब्रिजला आळा बसेल, असे मुंबई महापालिकेचे उपायुक्त किरण दिघावकर म्हणाले.
विविध आजारांचा धोका
मुंबईसह देशात वायू प्रदूषणाचे प्रमाण जागतिक मानांकनाच्या दृष्टीने जास्त असून त्यामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्याही मोठी आहे. प्रदूषणाचा फटका गर्भाला आणि लहान मुलांनाही बसत असून त्यांच्या वजन आणि उंचीवरही त्याचा परिणाम होत आहे. वायू प्रदूषणामुळे भारतीयांची फुफ्फुसे कमकुवत झाली असून दमा, मधुमेह, ब्लडप्रेशर, ऑटो इम्युन डिसिज ते फुफ्फुसाच्या कर्करोगाचा धोका वाढल्याचे फुफ्फुसरोग तज्ज्ञ लान्सलॉट पिंटो म्हणाले.