मुंबईतील डेब्रिज नवी मुंबईत; १० डंपर ताब्यात; १८ जणांविरोधात गुन्हे

मुंबईतील डेब्रिज नवी मुंबईत; १० डंपर ताब्यात; १८ जणांविरोधात गुन्हे

कारवाईदरम्यान, सिडकोच्या पथकाने वाहतूक पोलिसांच्या मदतीने वाशी टोल नाक्याजवळ डेब्रिजने भरलेले १० डंपर पकडले आहेत. तसेच सर्व डंपरचालक व त्यांचे मालक अशा एकूण १८ जणांविरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवी मुंबई : नवी मुंबई, पनवेल, उरण भागात मानवी आरोग्यास धोकादायक व पर्यावरणास हानीकारक असलेले डेब्रिज, माती, कचरा, रॅबीट अनधिकृतपणे टाकणाऱ्याविरोधात सिडकोने धडक कारवाईला सुरुवात केली आहे. या कारवाईदरम्यान, सिडकोच्या पथकाने वाहतूक पोलिसांच्या मदतीने वाशी टोल नाक्याजवळ डेब्रिजने भरलेले १० डंपर पकडले आहेत. तसेच सर्व डंपरचालक व त्यांचे मालक अशा एकूण १८ जणांविरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवी मुंबई, उरण, पनवेल भागातील मोकळ्या जागेमध्ये काही व्यक्तींकडून मानवी आरोग्यास धोकादायक व पर्यावरणास हानिकारक असलेले डेब्रिज अनधिकृतपणे टाकण्याचे प्रकार वाढत असल्याने अशा डेब्रिज माफियाविरोधात सिडकोने धडक कारवाईला सुरुवात केली आहे. गत ९ जानेवारी रोजी दुपारी मुंबईच्या विविध भागातून नवी मुंबई, उरण, पनवेलच्या दिशेने निघालेले डेब्रिज, माती, कचरा व रॅबीटने भरलेले १० डंपर वाहतूक पोलिसांनी वाशी टोलनाक्याच्या अलीकडे पकडले. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर सिडकोच्या अभियंत्यांनी वाशी टोल नाक्याजवळ धाव घेऊन सर्व डंपर ताब्यात घेतले.

सदर डंपरच्या तपासणीत त्यात मानवी जीवितांच्या आरोग्यास धोकादायक असलेले डेब्रिज, माती, कचरा, रॅबीट असल्याचे आढळून आले. तसेच सदर डंपर हे वरळी येथील एल ॲन्ड टी कंपनीच्या कामाच्या ठिकाणावरून, टिळक नगर येथील मदर डेअरी, साकीनाका येथील एससीसी प्लांट, छेडा नगर, सायन, कुर्ला, डॉकयार्ड रोड या वेगवेगळ्या भागातून नवी मुंबईतील पनवेल, उरण जासई, तुर्भे, येथे खाली करण्यासाठी जात असल्याचे आढळून आले. त्यानंतर सिडकोचे प्रभारी कार्यकारी अभियंता गोकुळ राठोड यांनी सर्व डंपर चालक व कंत्राटदार अशा एकूण १८ जणांविरोधात वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे, तसेच त्यांचे सर्व डंपर जप्त करण्यात आले आहे.

सिडकोकडून इशारा

सिडकोच्या परिक्षेत्रात विकासकामे प्रगतीपथावर सुरू असून सिडको परिसरात मानवी आरोग्यास हानिकारक अशा प्रकारचा कचरा, बांधकामाचा राडारोडा, उत्खननातील दगडमाती टाकण्यास सक्त मनाई आहे. असे करतांना कोणी आढळल्यास सदर व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा सिडकोच्या वतीने देण्यात आला आहे. सिडको परिक्षेत्रात अनधिकृत डेब्रिज टाकताना कोणी आढळल्यास संबंधितांनी जवळच्या पोलीस ठाण्यात माहिती द्यावी, असे आवाहन देखील सिडकोच्या वतीने करण्यात आले आहे.

logo
marathi.freepressjournal.in