'दख्खनची राणी' झाली ९६ वर्षांची; मुंबई-पुणे शहरांना जोडणारी अनोखी प्रेमकहाणी

मध्य रेल्वेची अत्यंत प्रतिष्ठेची आणि प्रवाशांची लाडकी 'डेक्कन क्वीन' अर्थात 'दख्खनची राणी'ने आज १ जूनला आपल्या सेवेची ९६ वर्षे पूर्ण केली आहेत. या गाडीने आता ९७ व्या वर्षात पदार्पण केले असून मुंबई आणि पुणे या दोन शहरांना जोडणारी ही राणी या पुढेही प्रवाशांची अविरत सेवा करत राहील, असे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
'दख्खनची राणी' झाली ९६ वर्षांची; मुंबई-पुणे शहरांना जोडणारी अनोखी प्रेमकहाणी
'दख्खनची राणी' झाली ९६ वर्षांची; मुंबई-पुणे शहरांना जोडणारी अनोखी प्रेमकहाणी Photo : Anand Chaini
Published on

मुंबई/पुणे : मध्य रेल्वेची अत्यंत प्रतिष्ठेची आणि प्रवाशांची लाडकी 'डेक्कन क्वीन' अर्थात 'दख्खनची राणी'ने आज १ जूनला आपल्या सेवेची ९६ वर्षे पूर्ण केली आहेत. या गाडीने आता ९७ व्या वर्षात पदार्पण केले असून मुंबई आणि पुणे या दोन शहरांना जोडणारी ही राणी या पुढेही प्रवाशांची अविरत सेवा करत राहील, असे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. दख्खनच्या राणीचा इतिहास म्हणजे मुंबई आणि पुणे या दोन शहरांच्या नात्याची कहाणी आहे. ही गाडी केवळ प्रवासाचे साधन न राहता प्रवाशांच्या पिढ्यानपिढ्या जोडणारी एक संस्था बनली आहे.

महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या दोन प्रमुख शहरांदरम्यान १ जून १९३० रोजी सुरू झालेली ही ट्रेन मध्य रेल्वेची पूर्वसुरी असलेल्या 'ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे'च्या (जीआयपीआर) इतिहासातील एक मैलाचा दगड ठरली. या भागातील दोन महत्त्वाच्या शहरांना जोडण्यासाठी सुरू करण्यात आलेली ही पहिली लक्झरी ट्रेन होती, जिचे नाव सार्थपणे 'डेक्कन क्वीन' किंवा 'दख्खनची राणी' असे ठेवण्यात आले.

Photo : Anand Chaini

थाटामाटात वाढदिवस

दख्खनच्या राणीचा वर्धापन दिन आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी पुणे-मुंबई डेक्कन क्वीन मुंबईसाठी निघताना पुणे स्थानकावर तर संध्याकाळी मुंबई-पुणे डेक्कन क्वीनच्या पुण्याकडे निघताना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे भव्य सोहळे पार पडले. फुलांनी अतिशय आकर्षकरीत्या सजवलेल्या या ट्रेनचा वाढदिवस रेल्वे अधिकारी, उत्साही प्रवासी आणि रेल्वेप्रेमींच्या उपस्थितीत केक कापून साजरा करण्यात आला.

Photo : Anand Chaini

‘पंजाब मेल’चाही वाढदिवस साजरा

विशेष म्हणजे, डेक्कन क्वीनचा वाढदिवस हा ऐतिहासिक 'पंजाब मेल'च्या वाढदिवसाशी जुळतो, जिची पहिली फेरीही १ जूनलाच सुरू झाली होती आणि आज सीएसएमटी येथे तिचाही वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

आधुनिक लूक

गाडीत आधुनिक फर्निचर, देखणा अंतर्गत सजावट आणि वारसा संस्कृतीची (हेरिटेज) झलक राखत डायनिंग कार अधिक आकर्षक करण्यात आली आहे. स्वच्छतागृहांमध्ये विनाइल फ्लोअरिंग, डुरो वाइप मॅट्स व आधुनिक सोप व टिश्यू डिस्पेन्सर्स बसवले. थीमवर आधारित रूफ व पॅनल बोर्ड्ससह डब्यांची अंतर्गत रचना आहे.

डायनिंग कार असणारी देशातील एकमेव ट्रेन

सध्या धावणाऱ्या ट्रेनमध्ये 'डायनिंग कार'ची सुविधा असणारी डेक्कन क्वीन ही देशातील एकमेव ट्रेन आहे. येथे टेबल सर्व्हिस दिली जाते आणि मायक्रोवेव्ह ओव्हन, डीप फ्रीझर व टोस्टर यांसारखी आधुनिक पॅन्ट्री साधने आहेत. ही डायनिंग कार मऊ गादीच्या खुर्च्या आणि कार्पेटने सजवलेली आहे.

Photo : Anand Chaini

ऐतिहासिक प्रवास एका नजरेत

दख्खनची राणी १९३० साली ७ डब्यांच्या २ रेक्ससह धावत असे. एक रेक चंदेरी-लाल रंगात तर दुसरा निळा व सोनेरी रंगात होता. डब्यांचे चेसिस इंग्लंडमध्ये बनवले तर बॉडी माटुंगा वर्कशॉपमध्ये तयार झाली. १९६६ साली इंटिग्रल कोच फॅक्टरी, पेरांबूरनिर्मित अँटी-टेलिस्कोपिक स्टील डबे बसवले व डब्यांची संख्या ७ वरून १२ केली. सध्या ही ट्रेन १६ डब्यांसह धावते. यात ४ एसी चेअर कार, ८ द्वितीय श्रेणी चेअर कार, १ व्हिस्टाडोम कोच, १ डायनिंग कार, १ जनरल व गार्ड डबा व १ जनरेटर कारचा समावेश आहे.

logo
marathi.freepressjournal.in