
मुंबई : मध्य रेल्वेच्या लोकप्रिय ट्रेनपैकी एक असलेली डेक्कन क्वीन १ जून रोजी ९६व्या वर्षांत प्रवेश करत आहे. या ट्रेनने गेली ९५ वर्षे प्रवाशांना सेवा दिली आहे. मुंबई आणि पुणे दरम्यान १ जून १९३० रोजी ही ट्रेन धावली होती.
मध्य रेल्वेने पहिल्या डिलक्स ट्रेनला "डेक्कन क्वीन" नाव दिले आहे. डेक्कन क्वीन" सुरुवातीला ७ डब्यांसह २ रॅकसह सादर करण्यात आली होती. ज्यापैकी एक चांदीच्या रंगात लाल मोल्डिंगसह रंगवण्यात आला होता. तर दुसरा रॉयल ब्लू रंगात सोनेरी रेषेने रंगवण्यात आला होता. मूळ रेकच्या डब्यांचे अंडरफ्रेम्स इंग्लंडमध्ये बनवण्यात आले होते, तर कोच बॉडी जीआयपी रेल्वेच्या माटुंगा कार्यशाळेमध्ये बनवण्यात आली होती.
मूळ रेकचे डबे १९६६ मध्ये पेरांबूर येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीद्वारे निर्मित अँटी-टेलिस्कोपिक स्टील बॉडी असलेल्या इंटिग्रल कोचने बदलण्यात आले. यानंतर कोचची संख्या ७ वरून १२ करण्यात आली. १९९५ मध्ये जुन्या रेकच्या जागी नवीन एअर ब्रेक रेक आणण्यात आला. १५ ऑगस्ट २०२१ पासून मुंबई-पुणे डेक्कन क्वीनमध्ये विस्टाडोम कोच जोडण्यात आला. यामुळे प्रवाशांना पश्चिम घाटातून जाताना चित्तथरारक दृश्य पाहण्याची सुवर्णसंधी मिळाली. ‘प्रोजेक्ट उत्कृष्ट’ अंतर्गत जून २०२२ मध्ये डेक्कन क्वीन एक्सप्रेसचे सर्व पारंपारिक कोच एलएचबी कोचने बदलण्यात आले. या कोचमध्ये एलईडी लाईट्स, बायो टॉयलेट, ब्रेल साइनेज इत्यादी आधुनिक सुविधा आहेत. आता ही ट्रेन १६ कोचच्या सुधारित संरचनेसह धावते. यामध्ये तीन वातानुकूलित चेअर कार, ९ द्वितीय श्रेणी चेअर कार, एक व्हिस्टा डोम कोच, एक डायनिंग कार, एक सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन आणि जनरेटर कार यांचा समावेश आहे.
भारतात पहिल्यांदाच डेक्कन क्वीनला अनेक गोष्टी प्रथमच सादर करण्यात आल्या आहेत. पहिल्यांदाच रोलर बेअरिंग असलेले डबे सादर करण्यात आले आहेत. पहिल्यांदाच एंड ऑन जनरेशन कोचच्या जागी ११० व्होल्ट सिस्टीम असलेले सेल्फ-जनरेटिंग कोच लावण्यात आले आहेत. तसेच पहिल्यांदाच प्रथम आणि द्वितीय श्रेणीचे चेअर कार सादर करण्यात आले आहेत.
डायनिंग कार असलेली एकमेव ट्रेन
डेक्कन क्वीन ही एकमेव ट्रेन आहे जिथे टेबल सर्व्हिस आणि मायक्रोवेव्ह ओव्हन, डीप फ्रीजर आणि टोस्टर सारख्या आधुनिक पेंट्री सुविधांसह डायनिंग कार आहे. डायनिंग कारमध्ये कुशन केलेल्या खुर्च्या आणि कार्पेट देखील आहेत. गेल्या ९५ वर्षांच्या रंगीबेरंगी इतिहासात, ही ट्रेन दोन शहरांमधील वाहतुकीचे फक्त एक साधन राहिलेली नसून अत्यंत निष्ठावंत प्रवाशांच्या पिढीला जोडणारी संस्था बनली आहे.