आता गडकिल्ल्यांवर मद्यपान करणाऱ्यांना ३ महिन्यांचा तुरुंगवास; सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवारांची घोषणा

सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत माहिती दिल्यानुसार आता गडकिल्ल्यांवर हुल्लडबाजी करणाऱ्यांवर चाप बसणार
आता गडकिल्ल्यांवर मद्यपान करणाऱ्यांना ३ महिन्यांचा तुरुंगवास; सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवारांची घोषणा

गडकिल्ले हे महाराष्ट्राचे वैभव आहेत. या गडकिल्ल्यांवर मद्यपान करण्याचे प्रकारही उघडकीस येत असतात. राज्य सरकार असे प्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार आहे. गडकिल्ल्यांवर मद्यपान करणाऱ्यांना यापुढे किमान ३ महिने कारावास तसेच किमान १०,००० रुपये दंड आकारण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी हेरिटेज मार्शल नेमण्यात येतील. तसेच, असे प्रकार उघडकीस आणणाऱ्यांना दंडाच्या ५० टक्के रक्कम बक्षीस म्हणून देण्याचेही प्रस्तावित आहे. राज्याच्या विधी व न्याय विभागाच्या मंजुरीसाठी हा प्रस्ताव पाठविण्यात आल्याची घोषणा सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केली. रायगड किल्ला केंद्र सरकारच्या अखत्यारित येत असून किमान ५ वर्षांसाठी तरी राज्य सरकारच्या ताब्यात द्यावा, अशी विनंती केंद्राला केल्याचेही ते म्हणाले.

राज्यातील गडकिल्ल्यांच्या संरक्षण, जतन, संवर्धनाचा मुद्दा लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आला होता. यावर सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, "राज्यात ३८७ संरक्षित स्मारके असून मागच्या सरकारच्या काळामध्ये या स्मारकांच्या देखभालीकडे दुर्लक्षच झाले होते. निधी देखील पुरेसा दिला जात नव्हता. आता मात्र जिल्हा नियोजनपैकी सुमारे ५१३ कोटींचा निधी देण्यात येणार असून ७५ स्मारकांच्या ठिकाणी जनसुविधा निर्माण करण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. यासाठी ६५ कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. शौचालये बांधण्यासाठी सुलभ इंटरनॅशनलला तीस वर्षांचे कंत्राट देण्यात येणार आहे. ३८७ स्मारकांवर त्यांची माहिती क्यूआर कोडच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार असून किल्ल्यांवरील अतिक्रमणेही दूर करण्यात येतील," असे मत त्यांनी व्यक्त केले.

logo
marathi.freepressjournal.in