मुंबई : मैदाने, क्रीडांगणे दत्तक तत्त्वावर देण्याची पाॅलिसी तयार असून, आयुक्तांच्या मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे. याबाबत लवकरच निर्णय होणार असून, पालिका आयुक्त डॉ. इक्बाल सिंह चहल यांची याविषयी भेट घेणार असल्याचे मुंबई उपनगराचे पालक मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.
मुंबईत एक हजारांहून अधिक मैदाने, क्रीडांगणे असून ती दत्तक तत्त्वावर देण्याचे प्रस्तावित आहे. ओपन स्पेस पाॅलिसीबाबत प्रारुप प्रस्तावित धोरण सप्टेंबर २०२३ मध्ये मुंबई महापालिकेने जाहीर केले. बँका, शाळा, क्रीडा, गृहनिर्माण संस्था, सरकारी संस्था, स्वयंसेवी संस्था, व्यापारी आणि दुकानदार संघटना, खासगी संस्था, कार्पोरेट क्षेत्रातील कंपन्या यापैकी पात्र ठरणाऱ्यांना ११ महिने ते पाच वर्षांपर्यंत मोकळ्या जागा दत्तक घेऊन त्यांची देखभाल करण्याचे प्रस्तावित आहे. पालिकेच्या उद्यान विभागाने विविध संस्थांना देखभालीसाठी दिलेले एकूण ५६२ हेक्टर क्षेत्रफळाचे ११०४ भूखंड ताब्यात घेण्यात आले आहेत. मनोरंजन मैदाने व क्रीडांगणे सुरक्षित ठेवण्यात पालिकेला यश मिळाले असले, तरी त्या ठिकाणी वेगवेगळ्या खेळांसाठी आवश्यक सोयीसुविधा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे ही मनोरंजन मैदाने व क्रीडांगणांचा विकास, देखभाल व दुरुस्ती सामुदायिक सामाजिक दायित्वातून करण्यासाठी दत्तक तत्त्वावर देण्यात येणार आहेत. यावर पालिकेने सप्टेंबरमध्ये जाहीर केलेल्या या प्रारूपावर हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या. १०० हून अधिक नागरिक व संस्थांनी आपल्या सूचना पालिकेला दिल्या आहेत. बहुसंख्य नागरिकांनी मोकळ्या जागा खासगी संस्था तसेच राजकीय नेत्यांकडे किंवा त्यांच्या संस्था व कार्यकर्त्यांनी विरोध करत पालिकेने या जागांची देखभाल करावी, अशा सूचना केल्या आहेत.
मलबार हिल जलाशयाचा निर्णय लवकरच
मलबार हिल जलाशय ब्रिटिशकालीन असून, आजही मजबूत स्थितीत आहे. त्यामुळे मेजर दुरुस्ती करण्याची गरज नाही, असे तज्ज्ञ समितीने स्पष्ट केले आहे. आय.आय.टी. पवईचे प्राध्यापक, स्थानिक तज्ज्ञ नागरिक, महापालिका अधिकारी अशी समिती स्थापन केली असून, समितीनेही दोन वेळा जलाशयाची पाहणी केली आहे. समितीने याबाबत अहवाल सादर केला असून, आय.आय.टी. पवईचा अहवाल लवकरच सादर होईल. पालक मंत्री म्हणून याचा पाठपुरावा सुरू असून, लवकरच निर्णय घेण्यात येईल.