मिठागर आयुक्तांना १८ कोटी रुपये अदा करण्याचा निर्णय; ईस्टर्न फ्रीवे ते कांजूर व्हिलेजदरम्यान रस्तेकामाचा मार्ग मोकळा

पूर्व द्रूतगती महामार्ग ते कांजूर व्हिलेजदरम्यान रस्ते कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. मिठागर आयुक्तांकडून ही जमीन पालिकेला हस्तांतरित झाल्याने पालिकेच्या मालकीची झाली आहे.
मिठागर आयुक्तांना १८ कोटी रुपये अदा करण्याचा निर्णय; ईस्टर्न फ्रीवे ते कांजूर व्हिलेजदरम्यान रस्तेकामाचा मार्ग मोकळा

मुंबई : पूर्व द्रूतगती महामार्ग ते कांजूर व्हिलेजदरम्यान रस्ते कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. मिठागर आयुक्तांकडून ही जमीन पालिकेला हस्तांतरित झाल्याने पालिकेच्या मालकीची झाली आहे. त्यामुळे या ठिकाणी रस्तेकामाचा मार्ग मोकळा झाला असून जमीन ताब्यात घेण्यासाठी मुंबई महापालिका मिठागर आयुक्तांना १८ कोटी रुपये अदा करणार आहे.

भारत सरकारच्या मिठागर आयुक्त यांच्या मालकीच्या कांजूर येथील विकास आराखडा २०३४ नुसार सुमारे ६० फूट रुंदीचा रस्त्यासाठी आरक्षित असलेला भूखंड महापालिकेने ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्व द्रूतगती महामार्ग ते कांजूरगाव असा जोडला जाणारा हा रस्ता वापरात असला तरी यावर अनेक बांधकामे आहेत. त्यामुळे या रस्त्यासाठी आरक्षित, बाधित जमिनीचा ताबा घेतला जात आहे. या नियोजित रस्त्यांची जागा मिठागर आयुक्तांकडून महापालिकेने ताब्यात घेऊन त्यावर रस्त्यांचे बांधकाम केले जावे, अशी मागणी स्थानिक माजी नगरसेविका सारिका मंगेश पवार यांनी नियोजन विभागाकडे या भूसंपादनाच्या कामाचा पाठपुरावा सुरू ठेवला होता. अखेर त्याला आता यश आले आहे.

विकास नियोजन विभागाच्या वतीने याबाबतची कार्यवाही पूर्ण करत या जमिनीचा मोबदला म्हणून मिठागर आयुक्तांना अर्थात केंद्र सरकारला १८ कोटी रुपयांची रक्कम अदा करत याचा ताबा घेण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत आहे.

कांजूर पूर्व येथील नागरिकांसाठी पूर्व द्रूतगती मार्ग तसेच जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड यांना जोणाऱ्या रस्त्यांची कामे हाती घेण्यात येत आहे. त्यानुसार पूर्व द्रूतगती मार्ग ते कांजूर व्हिलेज रोडला जोडणाऱ्या या रस्त्यांचा विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी हा मिठागर आयुक्तांकडून या रस्त्यांची जागा ताब्यात घेण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

logo
marathi.freepressjournal.in