
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी (मंगळवारी) राज्यभरात महाआरती करण्याचा जाहीर केलेला कार्यक्रम सोमवारी अचानक रद्द केला. ठाकरे यांनी एका निवेदनाद्वारे ही घोषणा केली असून, याबाबतची भूमिका मंगळवारी स्पष्ट करणार असल्याचे सांगितले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अक्षय्य तृतीयेच्या दिवशी राज्यभर महाआरती करण्याचे जाहीर केले होते. राज ठाकरे यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत त्याची घोषणा केली होती. तसेच रविवारी औरंगाबाद येथे झालेल्या सभेतही त्यांनी तशी घोषणा केली होती. सभा झाल्यानंतर मनसेकडून महाआरतीची तयारी सुरू करण्यात येणार होती. मात्र, सोमवारी महाआरती रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. राज ठाकरे यांच्या अनपेक्षित माघारीची राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा होती.
‘‘उद्या ईद आहे. कालच्या संभाजीनगरच्या सभेत त्या बाबतीत मी बोललो आहे. मुस्लीम समाजाचा हा सण आनंदाने साजरा व्हावा. आधी ठरल्याप्रमाणे अक्षय्य तृतीया या आपल्या सणाच्या दिवशी कुठेही आरत्या करू नका. आपल्याला कोणाच्याही सणात बाधा आणायची नाही. भोंग्यांचा विषय हा धार्मिक नसून, सामाजिक आहे आणि त्याबाबत आपण पुढे नेमके काय करायचे, हे मी उद्या (मंगळवारी) आपल्यासमोर मांडेन. तूर्तास एवढेच,’’ असे राज ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. मुंबई आणि ठाण्यातील सभेनंतर राज ठाकरे पुण्यात गेले होते. त्यावेळी त्यांनी तीन कार्यक्रम जाहीर केले होते. यात औरंगाबाद येथील सभा, अयोध्या दौरा आणि अक्षय्य तृतीयेच्या दिवशी राज्यभरात महाआरती करणार असल्याचे त्यांनी घोषित केले होते.