तेजस वाघमारे/मुंबई
शेकडो वर्षांचा इतिहास असताना अभिजात भाषेच्या दर्जापासून वंचित असलेल्या माय मराठीसाठी धारावीतील काळा किल्ला येथील श्री हनुमान सेवा मंडळ सरसावले आहे. मंडळाच्या सार्वजनिक गणेशोत्सवात 'मराठी' भाषेला अभिजात दर्जा मिळावा, या विषयावरील देखावा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.
मंडळाचा यंदा ६२ वा गणेशोत्सव आहे. २०१२ सालापासून तरुणांच्या हाती मंडळाचा कारभार आल्यानंतर याठिकाणी गणेशोत्सवात समाजातील विविध ज्वलंत विषयांवरील देखावे उभारून समाजमनाला जागे करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याचा प्रस्ताव गेली अनेक वर्षे सरकारदरबारी रखडला असून या मागणीला यंदा मंडळाने गणेश देखाव्याद्वारे वाचा फोडली आहे. या देखाव्यात राज्याला व पर्यायाने मराठी भाषेला जागतिक पातळीवर नेणाऱ्या महान व्यक्तींच्या कार्याची छायाचित्रांद्वारे माहिती मांडण्यात आली आहे. त्याचबरोबर स्लाईड शोमधून मराठी भाषेची महानता दाखवण्यात आली आहे.
मंडळाने पर्यावरण रक्षणाचा विडा उचलला असून गेल्या काही वर्षांपासून पर्यावरणपूरक कागदाच्या लगद्यापासून तयार करण्यात येणाऱ्या गणेशमूर्तीची स्थापना करण्यात येते, अशी माहिती मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार गणेश खाडे यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, पर्यावरणपूरक मूर्तीचे वजन ३५ ते ४० किलो असते. पर्यावरणाचा वसा घेतलेल्या या मंडळाला यापूर्वी विविध सामाजिक संस्थांनी, राज्य सरकार व पालिकेतर्फे पारितोषिक देऊन गौरवण्यात आले आहे.
धारावीत ज्वलंत सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणारे मंडळ म्हणून श्री हनुमान सेवा मंडळाने आपली ओळख निर्माण केली आहे. गणेशोत्सवात मंडळाचा देखावा पाहण्यास धारावी व आसपासच्या परिसरातील आबालवृद्ध मोठ्या संख्येने गर्दी करतात. मराठी भाषेच्या अभिजात दर्जाबाबत मंडळाने उभारलेल्या देखाव्याचे मुंबईकरांकडून कौतुक होत आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवाबरोबरच मंडळाने सामाजिक भानदेखील जपले आहे. मंडळाचे एक सभागृह असून यामध्ये महिलांना मोफत योगा प्रशिक्षण देण्यात येते. त्याचप्रमाणे वैद्यकीय शिबिरे, मुलांना शिष्यवृत्ती आदी उपक्रमही मंडळामार्फत राबविण्यात येतात.