महाविकास आघाडीच्या पराभवामुळे कार्यकर्त्यांची पाठ; राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यालयात शुकशुकाट

Maharashtra Assembly Elections Results 2024छ राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. निवडणुकीत महायुतीने जोरदार मुसंडी मारत बहुमतापेक्षा अधिक जागा मिळविल्या आहेत. निकालात झालेल्या पराभवामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यालयात शनिवारी शुकशुकाट पाहण्यास मिळाला.
महाविकास आघाडीच्या पराभवामुळे कार्यकर्त्यांची पाठ; राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यालयात शुकशुकाट
Published on

मुंबई : राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. निवडणुकीत महायुतीने जोरदार मुसंडी मारत बहुमतापेक्षा अधिक जागा मिळविल्या आहेत. निकालात झालेल्या पराभवामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यालयात शनिवारी शुकशुकाट पाहण्यास मिळाला. मुंबईत एकही जागा मिळवता न आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयाकडे पाठ फिरवली.

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे राज्यात विधानसभा निवडणुकीतही यश मिळेल, अशी आशा महाविकास आघाडीला होती. त्यानुसार शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, काँग्रेस आणि इतर पक्ष निवडणुकीला समोरे गेले.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होईल, असा विश्वास महाविकास आघाडीतील नेते करत होते. मात्र मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून महायुती अधिक जागांवर आघाडीवर असल्याचा कौल समोर आला. यामुळे महाविकास आघाडीमधील नेते, कार्यकर्ते नाराज झाले.

महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला ८६ जागा मिळाल्या होत्या. या जागांपैकी सुमारे ७० ते ८० टक्के जागा जिंकण्याचा विश्वास नेत्यांना होता. पवार गटाच्या जागांवर राज्यातील समीकरणे निश्चित होतील, असा कयास बांधण्यात आला होता. मात्र मतमोजणीमध्ये महायुतीच्या बाजूने कल जाताच नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली.

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या बेलार्ड इस्टेट येथील पक्ष कार्यालयात शुकशुकाट पसरला होता. कार्यालयातील कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त मुंबईतील प्रमुख नेत्यांनी कार्यालयाकडे पाठ फिरवली.

logo
marathi.freepressjournal.in