एमयूटीपी प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून निधी मिळण्यास उशीर

प्रकल्पांमध्ये ५१ टक्के निधी रेल्वेकडून आणि ४९ टक्के निधी राज्य सरकारकडून मिळण्यावरही शिक्कामोर्तब आहे.
 एमयूटीपी प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून निधी मिळण्यास उशीर
Published on

मध्य आणि पश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावरील एमयूटीपी अंतर्गत हाती घेण्यात आलेल्या प्रकल्पांसाठी राज्य सरकारकडून अद्यापही ५५० कोटी रुपये निधी मिळालेले नाही. यामुळे अनेक मुख्य प्रकल्प मार्गी लावण्यात अडचणी येत असल्याचे एमआरव्हीसीकडून सांगण्यात आले.

‘एमयूटीपी २’मध्ये सीएसएमटी ते कुर्ला पाचवा, सहावा मार्ग, मुंबई सेन्ट्रल ते बोरिवली सहावा मार्ग, तर ‘एमयूटीपी ३’मध्ये विरार ते डहाणू चौपदरीकरण, पनवेल ते कर्जत उपनगरीय मार्ग, ऐरोली ते कळवा लिंक रोड, ४७ वातानुकूलित लोकल अशा महत्त्वाच्या प्रकल्पांचा समावेश आहे. एमयूटीपी’अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांमध्ये ५१ टक्के निधी रेल्वेकडून आणि ४९ टक्के निधी राज्य सरकारकडून मिळण्यावरही शिक्कामोर्तब आहे. गेल्या तीन वर्षांत राज्य सरकारकडून १ हजार कोटी रुपये निधी मिळाला नव्हता. रेल्वेकडून ७०० कोटी रुपयांहून अधिक अतिरिक्त निधीचे वाटप करण्यात आले होते. आतापर्यंत राज्य सरकारच्या एमएमआरडीए आणि सिडकोकडून ४५० कोटी रुपये निधी प्राप्त झाला. आणखी ५५० कोटी रुपये येणे बाकी असून एमआरव्हीसीकडून सातत्याने राज्य सरकारला पत्रव्यवहार करण्यात येत आहे.

logo
marathi.freepressjournal.in