अजित पवार गटाला घेरणार शिष्टमंडळ उपराष्ट्रपतींना भेटले : प्रफुल्ल पटेल यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी

राष्ट्रवादीतील अंतर्गत वादात पक्ष, चिन्हावर दोन्ही गटांकडून दावा केला जात आहे. यासंबंधीची सुनावणी सध्या केंद्रीय निवडणूक आयोगात सुरू आहे
अजित पवार गटाला घेरणार शिष्टमंडळ उपराष्ट्रपतींना भेटले : प्रफुल्ल पटेल यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी

मुंबई : राष्ट्रवादीत उभी फूट पडल्याने पक्षातील शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यात पक्ष आणि चिन्हावरून निवडणूक आयोगात वाद सुरू आहे. तसेच सुप्रीम कोर्टातही सुनावणी सुरू आहे. एकीकडे कायदेशीर लढा सुरू असतानाच शरद पवार गटाने अजित पवार गटाला घेरण्याच्या जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचाच भाग म्हणून राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी राज्यसभेचे सभापती तथा उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्याकडे केली. याअगोदरच यासंबंधीचा अर्ज दिला होता. मात्र, अद्याप कारवाई केली गेली नसल्याने शिष्टमंडळाने राज्यसभा सभापतींची भेट घेऊन कारवाईची मागणी केली.

उपराष्ट्रपती धनखड यांना भेटलेल्या राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळात शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, वंदना चव्हाण यांचा समावेश होता. पक्षविरोधी कृती केल्यामुळे ४ महिन्यांपूर्वीच राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र, अद्याप त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे शरद पवार गटाने उपराष्ट्रपतींची भेट घेऊन पुन्हा एकदा पटेल यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी केली असल्याचे सूत्रांनी सांगितले. या भेटीत त्यांनी आम्ही चार महिन्यांपूर्वी जे पत्र दिले आहे, त्यावर अद्याप कार्यवाही करण्यात आलेली नाही. त्यामुळे आता तरी यावर उपराष्ट्रपतींनी योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली असल्याचे समजते.

पवारांची पॉवर?

राष्ट्रवादीतील अंतर्गत वादात पक्ष, चिन्हावर दोन्ही गटांकडून दावा केला जात आहे. यासंबंधीची सुनावणी सध्या केंद्रीय निवडणूक आयोगात सुरू आहे. त्यातच दोन्ही गटाचे नेतेही आता एकमेकांना अडचणीत आणण्यासाठी डावपेच आखत आहेत. मात्र, शरद पवारांची खेळी अजित पवार गटावर भारी पडते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in