मर्चट नेव्हीमध्ये कार्यरत असलेल्या अधिकार्‍याच्या नावाने पैशांची मागणी

 मर्चट नेव्हीमध्ये कार्यरत असलेल्या अधिकार्‍याच्या नावाने पैशांची मागणी
Published on

मर्चट नेव्हीमध्ये कार्यरत असलेल्या एका ५६ वर्षीय अधिकार्‍याच्या नावाने त्याच्या पत्नी, मुलीसह परिचित लोकांकडे पैशांची मागणी झाल्याचा प्रकार उघडकीस येताच अज्ञात सायबर भामट्याविरुद्ध वांद्रे पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. विशेष म्हणजे या भामट्याने पैशांसाठी त्याच्याच मुलीसह पत्नीला मॅसेज केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

या भामट्याने संबंधित अधिकार्‍याचा मोबाईल हॅक करुन मॅसेज पाठविल्याचे पोलिसांनी सांगितले. २० वर्षांची तक्रारदार तरुणी ही तिच्या आई-वडिलांसोबत वांद्रे येथे राहते. तिचे वडिल मर्चंट नेव्हीमध्ये कामाला असून सध्या ते कर्नाटक येथे कार्यरत आहेत. तिच्या आईची एक जाहिरात कंपनी आहे. गेल्या रविवारी ती तिच्या आईसोबत वांद्रे येथील खेरवाडी परिसरात आले होते. यावेळी तिच्यासह तिच्या आईला एक मॅसेज आला होता. हा मॅसेज तिच्या वडिलांचा होता. त्यात तिचे वडिलांनी महत्त्वाच्या कामासाठी पैशांची गरज असल्याचे सांगून त्यांना तातडीने पैसे पाठविण्याची विनंती केली होती. वडिलांनी आपण नेहमीच बोलत असताना त्यांनी अशा प्रकारे मॅसेज पाठवून पैशांची मागणी का केली याबाबत तिने त्यांना कॉल करुन विचारणा केली होती. यावेळी त्यांनी त्यांचा व्हॉटअप दोन तासांपासून बंद असल्याचे सांगितले. मी कोणालाही असा मॅसेज केलेला नाही. फसवणुकीचा हा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात धाव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला.

या घटनेची वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी गंभीर दखल घेत सायबर सेल पोलिसांना संमातर तपास करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे वांद्रे पोलिसांसह सायबर सेलकडून या गुन्ह्यांचा तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in