

मुंबई : दादरमधील प्रभाग क्रमांक १९१ मधून २०२६ची मुंबई महापालिका निवडणूक लढविणाऱ्या ठाकरे सेनेच्या नगरसेविका विशाखा राऊत यांच्या नगरसेवकपदाच्या अपात्रतेची मागणी जोर धरू लागली आहे. माजी शिवसेना आमदार सदा सरवणकर यांच्या कन्या आणि या निवडणुकीतील राऊत यांच्या प्रतिस्पर्धी प्रिया गुरव यांनी मंगळवारी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन दिले.
प्रिया गुरव यांनी राऊत यांनी ओबीसी महिलांसाठी राखीव असलेल्या प्रभागातून अवैध कुणबी जात प्रमाणपत्राच्या आधारे निवडणूक लढवल्याचा आरोप केला आहे. २४ ऑगस्ट रोजी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात त्यांनी पालघर जिल्हा जात पडताळणी समितीच्या २० ऑगस्टच्या आदेशाचा संदर्भ दिला आहे. हा आदेश आपल्याला ई-मेलद्वारे प्राप्त झाल्याचे गुरव यांनी नमूद केले आहे.
प्रभाग क्रमांक १९१ हा ओबीसी महिलांसाठी राखीव होता. राऊत यांनी शिवसेनेच्या उमेदवारीवरून निवडणूक लढविताना आपली पात्रता सिद्ध करण्यासाठी ओबीसी जात प्रमाणपत्र सादर केले होते. मात्र प्रमाणपत्राच्या वैधतेबाबत तक्रार दाखल झाल्यानंतर पालघर जिल्हा जात पडताळणी समितीने २१ ऑगस्ट रोजी राऊत यांचे ओबीसी प्रमाणपत्र रद्द करण्याचा आदेश दिल्याचे प्रिया गुरव यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राऊत यांनी हा निर्णय राजकीय दबावाखाली घेण्यात आल्याचा आरोप केला आहे. आपण ओबीसी प्रवर्गातीलच असून आपल्या कुटुंबाचे मूळ गाव पालघर जिल्ह्यात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
राऊत यांना १३ हजार २३६ मते मिळाली, तर प्रिया गुरव यांना १३ हजार ३९ मते मिळाली. अवघ्या १९७ मतांनी राऊत विजयी झाल्या. या निवडणुकीत या प्रभागातून केवळ दोन उमेदवार रिंगणात होते.