सायन पुलाच्या कामाला आचारसंहितेचा फटका; पुनर्बांधणीला डिसेंबर उजाडणार

पावसाळ्यानंतर विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता असल्याने सायन पुलाचे पाडकाम व पुनर्बांधणी तसेच पाचव्या व सहाव्या रेल्वेमार्गाच्या कामाला डिसेंबर उजाडेल, असे मध्य रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
सायन पुलाच्या कामाला आचारसंहितेचा फटका; पुनर्बांधणीला डिसेंबर उजाडणार

मुंबई : माहीमची जत्रा, त्यानंतर १० वी १२ वीच्या परीक्षा यामुळे सायन पुलावर हातोडा चालवण्यास वेळोवेळी स्थगिती मिळाली. परीक्षा संपल्यानंतर पुलाचे पाडकाम हाती घेण्यात येईल, असे पालिका व मध्य रेल्वेकडून सांगण्यात येत होते. मात्र, आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचार संहिता लागू झाल्याचा फटका पाडकामाला बसला आहे. त्यानंतर दोन महिन्यांवर पावसाळा येऊन ठेपल्याने पुलाचे काम करणे शक्य नाही. दरम्यान, पावसाळ्यानंतर विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता असल्याने सायन पुलाचे पाडकाम व पुनर्बांधणी तसेच पाचव्या व सहाव्या रेल्वेमार्गाच्या कामाला डिसेंबर उजाडेल, असे मध्य रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मध्य रेल्वेच्या हद्दीतील सायन स्थानकातील ब्रिटिशकालीन ११० वर्षें जुना रोड ओव्हर पूल पाडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. पुलाची पुनर्बांधणी करण्यासह पाचव्या व सहाव्या रेल्वेमार्गाचे काम करण्यात येणार आहे. सायन पुलाच्या कामासाठी वाहतूक पोलिसांची परवानगीही मिळाली आहे. मात्र, आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने दोन महिने पुलाचे काम होणे शक्य नाही, असे सांगितले जात आहे. त्यानंतर पावसाळा असल्याने पावसाळ्यातही पुलाचे काम शक्य नसल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात पुलाचे काम हाती घेतले जाईल, असे वाटत असले तरी विधानसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता असल्याने त्या कालावधीत पुलाचे काम करणे शक्य नाही. त्यामुळे सायन पुलाच्या कामाला डिसेंबर उजाडणार, असे मध्य रेल्वे व पालिका प्रशासनाकडून सांगण्यात येते. त्यामुळे धोकादायक बनलेल्या सायन पुलाचे काम विविध कारणांमुळे लांबणीवर पडत आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in