सायनचा ब्रिटिशकालीन पूल होणार जमीनदोस्त; बुधवारी रात्रीपासून पाडकाम

सायन पुलाची पुनर्बांधणी पाचव्या व सहाव्या लेनचे काम यासाठी दीड वर्षं रोड ओव्हर पूल वाहतुकीसाठी बंद असणार आहे. त्यामुळे खासगी वाहनधारक, टॅक्सीचालक, दुचाकी, चारचाकी वाहनांच्या मार्गांत तसेच बेस्ट बसमार्गांवर बदल करण्यात आले आहेत.
सायनचा ब्रिटिशकालीन पूल होणार जमीनदोस्त; बुधवारी रात्रीपासून पाडकाम

मुंबई : मध्य रेल्वेच्या सायन स्थानकातील रोड ओव्हर पूल ११० वर्षं जुना झाल्याने तो पाडून नव्याने उभारण्यात येणार आहे. तसेच पाचव्या व सहाव्या रेल्वे मार्गाचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामासाठी रोड ओव्हर पुलाचे पाडकाम बुधवार, २७ मार्चला रात्री १२ वाजल्यापासून हाती घेण्यात येणार आहे. पुलाचे पाडकाम त्यानंतर पुनर्बांधणी, पाचव्या व सहाव्या लेनचे काम यासाठी एकूण एक ते दीड वर्षांचा कालावधी लागणार आहे. या सगळ्या कामासाठी रोड ओव्हर पूल वाहतुकीसाठी पूर्णतः बंद करण्यात येणार असल्याने पुढील दीड वर्षं मुंबईकरांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान, वाहनधारकांची गैरसोय होऊ नये यासाठी वाहतुकीच्या मार्गांत बदल करण्यात आले असून तसे दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत.

सायन स्थानकातील ब्रिटिशकालीन ११० वर्षं जुना रोड ओव्हर पूल वाहतुकीसाठी धोकादायक झाल्याने पाडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. हा पूल पाडल्यानंतर पुलाची पुनर्बांधणी करण्यासह पाचव्या व सहाव्या लेनचे काम हाती घेण्यात येणार आहे. सायन पुलाच्या कामासाठी वाहतूक पोलिसांची परवानगी मिळाली आहे. मात्र, ४ जानेवारीपर्यंत माहीमची जत्रा असल्याने व त्यानंतर १० वी व १२ वीच्या परीक्षा असल्याने पुलाच्या पाडकामास स्थगिती द्यावी, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्र्यांना केली होती. शेवाळे यांची मागणी योग्य असल्याचे सांगत परीक्षा संपल्यानंतर पुलाचे पाडकाम हाती घेण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. अखेर आता २७ मार्चला रात्री १२ वाजल्यापासून पुलाचे पाडकाम हाती घेण्यात येणार आहे, असे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील लीला यांनी सांगितले.

दरम्यान, सायन पुलाची पुनर्बांधणी पाचव्या व सहाव्या लेनचे काम यासाठी दीड वर्षं रोड ओव्हर पूल वाहतुकीसाठी बंद असणार आहे. त्यामुळे खासगी वाहनधारक, टॅक्सीचालक, दुचाकी, चारचाकी वाहनांच्या मार्गांत तसेच बेस्ट बसमार्गांवर बदल करण्यात आले आहेत.

४९ कोटींचा खर्च

मध्य रेल्वेने महानगरपालिकेच्या समन्वयाने सायन रेल्वे स्थानकातील रोड ओव्हर पुलाची पुनर्बांधणी व नवीन रस्ता बांधण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन रोड ओव्हर पूल बांधणीसाठी मध्य रेल्वे २३ कोटी रुपये, तर नवीन रस्ता बांधण्यासाठी मुंबई महापालिका २६ कोटी रुपये खर्च करणार आहे.

पुलाची लांबी वाढणार

सायन रेल्वेवरील रोड ओव्हर पूल सद्य:स्थितीत ४० मीटर लांब आहे. तो ५१ मीटरपर्यंत वाढवण्यात येणार आहे. अहवालानुसार हा पूल दोन स्पॅनवर असून त्याचा एक खांब रेल्वे मार्गावर आहे. नवीन पूल एकाच स्पॅनवर असेल आणि रेल्वे मार्गावर खांब नसेल.

असे आहेत बसमार्गांतील बदल

  • बस क्र. ११ मर्यादित ही बस कलानगरमार्गे टी जंक्शन व सुलोचना शेट्टी मार्गाने सायन हॉस्पिटलमार्गे नेव्ही नगर येथे जाईल.

  • बस क्र. १८१ , २५५ (मर्यादित), ३४८ (म.), ३५५ (म.) या बसेस कलानगरमार्गे टी जंक्शन व सुलोचना शेट्टी मार्गाने सायन हॉस्पिटल, सायन सर्कलमार्गे जातील.

  • बस क्र. ए ३७६ ही सायन सर्कलहून सायन हॉस्पिटल सुलोचना शेट्टी मार्गाने बावरी कॅम्पमार्गे माहीम येथे जाईल.

  • सी ३०५ ही बस धारावी आगारहून पिवळा बांगला टी जंक्शन व सुलोचना शेट्टी मार्गाने सायन हॉस्पिटलहून बॅकबे आगार येथे जाईल.

  • बस क्र.३५६ (म.), ए ३७५, व सी ५०५ या बसेस कलानगर बीकेसीहून प्रियदर्शनी येथे जातील.

  • बस क्र. ७ (म.), २२ (म.), २५ (म.) व ४११ या बस महाराष्ट्र काटा, धारावी आगारहून पिवळा बांगला टी जंक्शन व सुलोचना शेट्टी मार्गाने सायन हॉस्पिटलमार्गे जातील.

  • बस क्र. ३१२ व ए ३४१ या बसेस महाराष्ट्र काटा, धारावी आगारहून पिवळा बांगला टी जंक्शन व सुलोचना शेट्टी मार्गाने सायन हॉस्पिटल, सायन सर्कलमार्गे जातील.

  • बस क्र. एसी ७२ भाईंदर स्थानक ते काळा किल्ला आगार व सी ३०२ ही बस मुलुंड बसस्थानक ते काळा किल्ला आगार येथे खंडित करण्यात येईल.

  • बस क्र. १७६ व ४६३ या बस काळा किल्ला आगार येथून सुटतील व सायन स्थानक ९० फूट मार्गाने लेबर कॅम्प मार्गाने दादर-माटुंगा स्थानकाकडे जातील.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in