मुंबई : पावसाळ्यात मुंबईत उद्भवणाऱ्या मलेरिया, डेंग्यूचा धोका अधिक वाढला आहे. मलेरिया, डेंग्यूच्या प्रसारास कारणीभूत एडिस व ॲनोफिलीस डासांची ३० हजार ४९५ उत्पत्तीस्थाने आढळली आहेत. त्यामुळे मुंबईत मलेरिया, डेंग्यूचा धोका वाढला आहे. दरम्यान, साथीचे आजार रोखण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाने ११ लाख ९४ हजार ७४८ घरांचे सर्वेक्षण केले. यात १ लाख ६६ हजार १७३ जणांचे रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.
यंदा जून महिना कोरडा गेला असला तरी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून वरुणराजाची दमदार इनिंग सुरू आहे. जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाल्यानंतर आता साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. जुलै महिन्यात मलेरियाचे ७९७, डेंग्यूचे ५३५, लेप्टोचे १४१, गॅस्ट्रोचे १,२३९, कावीळीचे १४६, चिकुनगुनियाचे २५ तसेच स्वाईन फ्लूचे १६१ रुग्ण आढळले आहेत. जुलै महिन्याच्या गेल्या दोन आठवड्यात साथीच्या आजारांच्या रुग्णसंख्येत दुपटीने वाढ झाल्याने मुंबईत मलेरिया, डेंग्यू, स्वाईन फ्लू, गॅस्ट्रोचा धोका वाढला आहे.
गेल्या शुक्रवारपासून पावसाने काहीशी उसंत घेतली आहे. मात्र त्यानंतर साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. त्यामुळे मुंबईकरांनी काळजी घ्यावी, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे. दरम्यान, साथीचे आजार रोखण्यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. मलेरियाचा फैलाव रोखण्यासाठी २५ हजार ९५ इमारतींची तर ३९१० बांधकाम ठिकाणची झाडाझडती घेण्यात आली. यात ६८ हजार ४५३ ॲनोफिलीस डासांची उत्पत्तीस्थाने आढळली. यात ४,३३१ ठिकाणी ॲनोफिलीस डासांच्या अळ्या सापडल्या.
डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १४ लाख २९ हजार ४६१ घरांची झाडाझडती घेण्यात आली. तर १५ लाख ४२ हजार ४४१ कंटेनरची तपासणी करण्यात आली. यात २६ हजार १६४ एडिस डासांच्या अळ्या सापडल्याने मुंबईत साथीच्या आजारांनी पाय रोवले आहेत, हे दिसून येते. दरम्यान, ताप, सर्दी, खोकला असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत, असा सल्ला पालिकेच्या आरोग्य विभागाने दिला आहे.
‘भाग मच्छर भाग’ जनजागृती विशेष मोहीम!
डेंगी आणि मलेरिया आजाराच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि नियंत्रणासाठी लघुपटाच्या माध्यमातून जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. ‘भाग मच्छर भाग’ या विशेष जनजागृती मोहिमेत मराठी, हिंदी, चित्रपटसृष्टीतील अभिनेते तसेच सेलिब्रिटी, प्रसिद्ध व्यक्ती यांचा सहभाग घेण्यात येत असून डास प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे आवाहन करणारा हा संदेश सेलिब्रिटींमार्फत व्हिडीओच्या माध्यमातून देण्यात येत आहे.