पावसाळी आजार रोखण्यात मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने विविध उपक्रम राबवले. तरीही मुंबईत ७३ हजार ५५ ठिकाणी डेंग्यू पसरवणाऱ्या डासांची उत्पत्तीस्थाने आढळून आली आहेत. त्यामुळे मुंबईत डेंग्यूचा धोका कायम आहे.
मलेरिया प्रसार करणाऱ्या एनोफिलीस डासांवर नियंत्रण करण्यासाठी पालिकेने विहिरी, पाण्याच्या टाक्या, तरण तलाव अशा चार लाख सात हजार ७९७ ठिकाणी भेटी दिल्या. एकूण उत्पत्तीस्थानांपैकी नऊ हजार ७३४ ठिकाणी मलेरिला पसरवणारे एनोफिलीस डास आढळले, तर डेंग्यू नियंत्रणाच्या कारवाईत पालिकेने पाण्याची पिंपे, टायर, ऑड आर्टिकल, पेट्री लेट्स, फेंगशुई झाडे, मनी प्लांट या ठिकाणी तपासणी केली. त्या ठिकाणी डेंग्यू पसरवणाऱ्या एडिस डासांची एकूण ७३ हजार ५५ उत्पत्तीस्थाने पालिकेला आढळली.
पालिकेने कारवाईत आकारला १४ लाखांचा दंड
या कारवाईत पालिकेने छपरावरून तसेच विविध आवारातून १३ हजार ६९२ टायर्स काढले, तर ऑड आर्टिकल्स म्हणून तीन लाख ७४ हजार ५९६ आर्टिकल्स काढण्यात आले. पालिकेने सप्टेंबर अखेरीपर्यंत केलेल्या कारवाईत ११ हजार ४९२ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत, तर ७८२ प्रकरणांत पालिकेने दावे दाखल केले आहेत, तर १४ लाख ९ हजार ८०० रुपयांचा दंड या सगळ्या प्रकरणात आकारण्यात आला आहे. दरम्यान, या मोहिमेबरोबरच आता नागरिकांच्या सहभागासाठी पालिकेने पावले उचलली आहेत.