दिव्यांग असल्याने नाकारला विमान प्रवास

अरविंद प्रभू बाली येथे होणाऱ्या जागतिक पिकलबॉल स्पर्धेसाठी निघाले होते
दिव्यांग असल्याने नाकारला विमान प्रवास

दिव्यांग असल्याचे कारण देत भारतीय पिकलबॉल संघटेनेचे अध्यक्ष अरविंद प्रभू यांना व्हिएटजेट इंडिया एअरलाईन्स कंपनीने विमानात प्रवेश नाकारल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळार हा प्रकार घडला असून यामुळे सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

अरविंद प्रभू बाली येथे होणाऱ्या जागतिक पिकलबॉल स्पर्धेसाठी निघाले होते. ते दिव्यांग असल्याने त्यांच्यासोबत त्यांचे चार सहाय्यक होते. सहाय्यकांसह ते बोर्डिंग पास घ्यायला गेले असता त्यांना पास देण्यात आला नाही; मात्र त्यांच्या सहाय्यकांना पास मिळाला. याबाबत त्यांनी विचारला असता कंपनीने त्यांच्या धोरणात दिव्यांग लोकांना एअरलाईन प्रवास करू देत नाही, असे स्पष्टीकरण दिले. यासोबत 'आमचे लो कॉस्ट एअरलाईन्स असल्याने दिव्यांगांसाठी केबिन चेअर उपलब्ध नाहीत. तसेच तुमच्यासारख्या दिव्यांगांना आमची एअरलाईन प्रवास करू देत नाही. तसे आमचे धोरण आहे, तुमची व्हिलचेअर विमानात नेता येणार नाही.’असे व्हिएटजेट इंडिया एअरलाईन्स कंपनीकडून सांगण्यात आले. यावर अरविंद प्रभू यांनी संताप व्यक्त करत, ‘माझा अपघात झाल्यामुळे ३५ वर्षांपासून मी व्हिलचेअरवर आहे. इतकी वर्षे मी जगभर व्हिलचेअरने प्रवास केला आहे. माझ्यासारख्या व्यक्तीला दिव्यांग असल्याने प्रवास नाकारला जात असेल, तर समान्याचे काय हाल होत असतील?’असा प्रश्न प्रभू यांनी उपस्थित केला आहे. या घटनेमुळे सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, यापूर्वी देखील अशीच एक घटना उघडकीस आली होती. रांची-हैदराबाद इंडिगो विमानात एका दिव्यांग मुलाला प्रवेश देण्यास नकार देण्यात आला होता. यानंतर इंडिगोने या प्रकाराबाबत दिलगिरीही व्यक्त केली होती. मात्र केंद्रीय वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी या घटनेचा तीव्र निशेष केल्याने डीजीसीएने इंडिगोविरोधात कारवाई करत पाच लाखांचा दंड ठोठावला.

डीजीसीएचा नेमका नियम काय?

विमान कंपन्या अपंग प्रवाशांना प्रवेश नाकारू शकत नाही. नाकारण्यासाठी आधी डीजीसीए किंवा डॉक्टरांची परवानगी घ्यावी लागेल. जर अपंग प्रवाशांना प्रवेश नाकरला तर विमान कंपन्यांना लेखी कारण द्यावे लागेल. अपंग प्रवाशांना हवाई प्रवास सुलभ व्हावा याकरता नियमांमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, या नियमांचं पालन न करणाऱ्या कंपन्यांवर डीजीसीए कारवाई करू शकते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in