बकरी ईदसाठी देवनार पशुवधगृह सेवा-सुविधांसह सुसज्ज

बकरी ईद या सणानिमित्त देवनार पशुवधगृहात जिवंत बकरे व म्हैसवर्गीय प्राण्यांच्या बाजारास परवानगी दिली जाते
बकरी ईदसाठी देवनार पशुवधगृह सेवा-सुविधांसह सुसज्ज
Published on

बकरी ईद सण यंदा १० जुलै रोजी अपेक्षित असून बकरी ईदला म्हैसवर्गीय प्राण्यांच्या पशुवधासाठी यंदा प्रथमच ऑनलाईन आरक्षण सुविधा उपलब्ध करण्यात येत आहे. बकर्‍यांचा धार्मिक वध पशुवधगृहाबाहेर महानगरपालिकेच्या धार्मिक पशुवध धोरणानुसार करण्यासाठी परवानगी घेण्यात यावी, असे आवाहन पालिकेच्या देवनार पशुवधगृह विभागाने केले आहे.

आशिया खंडातील सर्वांत मोठे देवनार पशुवधगृह बकरी ईद सणानिमित्त सर्व सेवा-सुविधांसह सुसज्ज होत आहे. या पूर्वतयारीसह सेवा-सुविधांचा आढावा घेण्याच्या दृष्टीने अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) आशीष शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संबंधित अधिकाऱ्यांची विशेष आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीला महापालिकेचे उप आयुक्त विश्वास शंकरवार, एम/पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त महेंद्र उबाळे, पोलीस, इतर संबंधित खाते प्रमुख तसेच देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक कलीमपाशा पठाण, अग्निशमन दल व वाहतूक पोलीस यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बकरी ईद या सणानिमित्त देवनार पशुवधगृहात जिवंत बकरे व म्हैसवर्गीय प्राण्यांच्या बाजारास परवानगी दिली जाते. यंदा हा सण १० जुलै रोजी होणे अपेक्षित आहे. देवनार पशुवधगृहात २९ जून सकाळी ६ वाजेपासून बकर्‍यांना व २८ जूनपासून म्हैसवर्गीय प्राण्यांना देवनार पशुवधगृहात प्रवेश दिला जाणार आहे. तसेच म्हैसवर्गीय प्राण्यांचा पशुवध हा फक्त देवनार पशुवधगृह आत करण्याची परवानगी आहे. त्यासाठी देवनार पशुवधगृहात विशेष व्यवस्था १०, ११ व १३ जुलै या दिवसासाठी करण्यात येणार आहे.

अतिरिक्त तात्पुरते निवारे

बकरे व म्हैसवर्गीय प्राण्यांच्या निवाऱ्यासाठी स्थायी स्वरूपातील निवास क्षमतेसह अतिरिक्त तात्पुरते निवारे उभारण्यात येत आहेत. संपूर्ण परिसर हा सीसीटीव्हीच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी एकूण ३६४ सीसीटीव्ही बसविण्यात येत आहेत. नागरिकांच्या अडचणी सोडविणे व मदत करण्यासाठी २४ X ७ कार्यरत नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येत आहे. तेथे समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येत आहे. ७३०४१८४६३६ या नियंत्रण कक्षात संपर्क साधावा.

logo
marathi.freepressjournal.in