धरण क्षेत्रातील पाणीसाठ्यात घट; दोन महिन्यात ३ लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा कमी

तलाव क्षेत्रात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने सातही तलाव पाण्याने भरली होती. सप्टेंबर अखेरपर्यंत तलावात सरासरी १०० टक्के पाणीसाठा होता
धरण क्षेत्रातील पाणीसाठ्यात घट; दोन महिन्यात ३ लाख दशलक्ष लिटर पाणीसाठा कमी
Published on

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात यंदा समाधानकारक पाऊस बरसला नाही. त्यामुळे दोन महिन्यांत धरण क्षेत्रातील पाणीसाठ्यात घट झाली आहे. ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यात तब्बल २ लाख ९२ हजार ९६४ दशलक्ष लिटरने पाणीसाठा घटल्याने मे महिन्यात मुंबईला पाणी कपातीचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तलाव क्षेत्रात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने सातही तलाव पाण्याने भरली होती. सप्टेंबर अखेरपर्यंत तलावात सरासरी १०० टक्के पाणीसाठा होता; मात्र ऑक्टोबर हिटमुळे पाण्याचे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन झाले. तर पाणी गळती व चोरीमुळे पाण्याची नासाडी होत आहे. त्यात पाण्याची मागणी वाढल्यामुळे ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत म्हणजे ऑक्टोबर व नोव्हेंबर या दोन महिन्यात पाणीसाठा ७९.७६ टक्के इतका खाली आला. २०२२ मध्ये तीस जुलै पर्यंत हीच टक्केवारी ८४.३५ टक्के इतकी होती. २०२१ मध्ये सरासरी २०२२ इतकाच म्हणजे ८४.२९ टक्के पाणीसाठा होता. यंदा पाण्यामध्ये मोठी घट दिसून येत असल्यामुळे उन्हाळ्यात पाणीटंचाईचे चटके बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोडक सागर मध्य वैतरणा अप्पर वैतरणा भातसा तानसा विहार व तुळशी या सात तलावामध्ये १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध असणे गरजेचे आहे. तर सध्या सातही तलावामध्ये ११ लाख ५४ हजार ३९९ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा आहे. त्यामुळे दोन महिन्यांत पाणीसाठ्यात घट झाल्याने मुंबईवर मे महिन्यात पाणी कपातीची टांगती तलवार कायम आहे.

धरणातील पाणीसाठा ( दशलक्ष लिटर)

अप्पर वैतरणा २,१८,८१४

मोडक सागर ९५,५८१

तानसा १,१७,०९५

मध्य वैतरणा १,१२,२३८

भातसा ५,७९,५३५

विहार २३,६०२

तुळशी ६,५३४

logo
marathi.freepressjournal.in