भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याकरिता चार डॉग व्हॅन तैनात

भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याकरिता चार डॉग व्हॅन तैनात

मुंबईतील भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यासाठी निर्बीजीकरण गरजेचे आहे. भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्याकरिता त्यांना पकडण्यासाठी मुंबई महापालिकेने चार डॉग व्हॅन खरेदी केल्या आहेत. मुलुंड, मालाड, महालक्ष्मी व वांद्रे येथे या चार डॉग व्हॅन तैनात ठेवण्यात येणार आहेत.

निर्बीजीकरण, कुत्र्यांना जखम झाल्याची तक्रार मिळाल्यानंतर देवनार येथील प्राण्यांच्या दवाखान्यात दाखल करण्यात येते. सात दिवसांनंतर तपासणी केल्यावर प्रकृती स्थिर असल्यास ज्या ठिकाणांहून आणले, त्या ठिकाणी कुत्र्याला पुन्हा सोडण्यात येते, असे देवनार पशुवैद्यकीय महाव्यवस्थापक ए.के. पठाण म्हणाले.

मुंबईत भटक्या कुत्र्यांची संख्या दोन लाख ९६ हजार २२१च्या आसपास आहे. ही भटकी कुत्री रस्त्यांवरून ये-जा करणाऱ्याचा चावा घेत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत असतात. भटक्या कुत्र्यांनी गेल्या चार वर्षांत तीन लाखांहून अधिक लोकांचे लचके तोडले आहेत. भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाने चार डॉग व्हॅन खरेदी केल्या असून, कुत्र्यांचे निर्बीजीकरण करण्यासाठी या व्हॅनचा वापर करण्यात येतो, असेही पठाण यांनी सांगितले.

मुंबई महापालिकेचा आरोग्य विभाग व देवनार कत्तलखान्याचे महाव्यवस्थापक यांच्या अखत्यारित खासगी संस्था व श्वान नियंत्रण कक्ष भटक्या कुत्र्यांना पकडणे, त्यांचे निर्बीजीकरण करणे आदी कामे करण्यात येतात. आता भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या डॉग व्हॅन मुदत संपल्याने कालबाह्य झाल्या आहेत. त्यामुळे पालिकेने या भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी एक कोटी दोन लाख रुपये खर्चून व्हॅन विकत घेतल्या.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in