मुंबई : मुंबई महापालिकेने गेल्या पाच वर्षांच्या कालावधीत २ हजार ३६० कोटी रुपयांच्या ठेवी मुदतीपूर्वीच मोडल्या आहेत. पैकी ९४९ कोटी ५० लाख रुपये एमएमआरडीएला तर ७५६ कोटी ५० लाख रुपयांची रक्कम बेस्ट उपक्रमाला अधिदान म्हणून देण्यात आली आहे.
एमएमआरडीएला अधिदान करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियात जमा असलेली महापालिकेची ९४९ कोटी ५० लाख रुपयांची मुदत ठेव १५ मार्च २०२४ रोजी मोडण्यात आली. माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना माहितीच्या अधिकारात पालिकेने हा तपशील दिला आहे.
महापालिकेने गेल्या पाच वर्षांत ८ मुदत ठेव या मुदतीआधीच मोडल्या आहेत. त्यांची एकत्रित रक्कम २,३६० कोटी २० लाख १९ हजार रुपये आहे.
१९ ऑगस्ट २०१९ रोजी महापालिकेने बेस्ट उपक्रमाला मदत देण्यासाठी २५० कोटी आणि ११३ कोटी अशा दोन ठेवी मोडल्या. त्यानंतर २१ ऑगस्ट २०१९ रोजी ११५ कोटींची आणखी एक मुदत ठेव बेस्टला अधिदान करण्याकरिता मोडण्यात आली.
या सर्व मुदत ठेवी स्टेट बँक ऑफ इंडियातील होत्या. २५ मार्च २०२२ रोजी बेस्टला अधिदान करण्याकरिता याच बँकेतील आणखी तीन मुदत ठेवी मोडण्यात आल्या. त्या १०० कोटी, ९२.०६ कोटी आणि ८७.०६ कोटी रकमेच्या होत्या.
कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ६४५ कोटी २० लाख
२०२२ मध्ये पालिका कर्मचारी, निवृत्तीवेतनधारक यांचे ऑगस्ट महिन्यांचे वेतन/निवृत्ती वेतनाचे अधिदान गणेशोत्सवाच्या सणापूर्वी २९ ऑगस्टला करण्यासाठी युनियन बँक ऑफ इंडियातील ६४५ कोटी २० लाख ७ हजार रुपयांची ठेव या दिवशी मोडण्यात आली.