
मुंबई : जर्मनी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ कार्यक्रमाचा १०४वा भाग ऐकण्याची संधी मिळाली. या भाषणादरम्यान पंतप्रधानांनी चांद्रयान मोहिमेत महिलांचे योगदान महत्त्वपूर्ण राहिले असल्याचे सांगत देशाचे भविष्य उज्ज्वल आहे, असे म्हटले असल्याचे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. याप्रसंगी महिला आमदार विद्या ठाकूर, मोनिका राजळे, ऊमा खापरे, आश्विनी जगताप, मनीषा चौधरी, सीमा हिरे उपस्थित होते.
महाराष्ट्र विधानमंडळाच्या दोन्ही सदनाच्या आमदारांचे शिष्टमंडळ सध्या युरोप दौऱ्यावर गेले आहे. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे या शिष्टमंडळाचे नेतृत्व करत आहेत. विशेष म्हणजे शिष्टमंडळात निम्मी संख्या महिला आमदारांची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमातून रविवारी देशवासियांना संबोधित केले. ‘मन की बात’ कार्यक्रम दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित होतो. रविवार २७ ऑगस्ट रोजी या कार्यक्रमाचा १०४ वा भाग प्रसारित करण्यात आला.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मिशन चांद्रयान’ हे नवीन भारताच्या भावनेचे प्रतीक बनले आहे. भारताने जी-२० ला अधिक समावेशक व्यासपीठ बनवले आहे. जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेत भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. ‘हर घर तिरंगा’ला प्रचंड यश मिळाले असून त्याअंतर्गत सुमारे दीड कोटी तिरंग्यांची विक्री झाली आहे. संस्कृत ही सर्वात प्राचीन भाषांपैकी एक आहे, अनेक आधुनिक भाषांची जननी आहे, जेव्हा आपण आपल्या मातृभाषेशी जोडतो तेव्हा आपण नैसर्गिकरित्या आपल्या संस्कृतीशी जोडतो. दुग्धव्यवसायामुळे आपल्या माता-भगिनींचे जीवन बदलले आहे. असे मुख्य मुद्दे पंतप्रधान मोदी यांनी मन की बात कार्यक्रमात सांगितल्याचे डॉ.गो-हे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.