"अडीच वर्षानंतर असा आलो...", फडणवीस यांचे राष्ट्रवादी-शिवसेनेच्या फुटीवर मोठे विधान

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ४०० पारचा नारा हा अहंकार नाही तर, जनतेबद्दलचा मोदींचा विश्वास आहे", असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
"अडीच वर्षानंतर असा आलो...", फडणवीस यांचे राष्ट्रवादी-शिवसेनेच्या फुटीवर मोठे विधान

मुंबई : मी पुन्हा आलो, त्यासाठी अडीच वर्ष लागली. पण अडीच वर्षानंतर असा आलो की, दोन पक्ष फोडून आणि दोन साथीदारांना सोबत घेऊन आलो, असे विधान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. 'काँग्रेस न होती तो क्या होता' या पुस्तकाचे फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी फडणवीसांनी घराणेशाही, राष्ट्रवादी काँग्रेस-शिवसेना फूट आणि लोकसभा निवडणूक यासारख्या मुद्यांवर भाष्य केले आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात दोन वाक्य खूप प्रसिद्ध आहेत. एक म्हणजे मी पुन्हा येईन आणि एकटा देवेंद्र काय करणार? या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, "मी पुन्हा येईन हे एक वाक्य नव्हते तर, त्यासोबत मी कशासाठी, कोणाच्या सेवेसाठी आणि महाराष्ट्राला कसे बदलणार आहे, यासाठी मी पुन्हा येईन हे वाक्य होते. परंतु, लोकांनी मी पुन्हा येईन ही एक ओळ घेतली. त्यानंतर लोकांनी आम्हाला निवडून देखील दिले. मग सत्ता आणि खुर्चीसाठी उद्धव ठाकरेंनी आमच्या पाठीत खंजीर खुपसले. त्यावेळी लोकांनी आमच्यावर टीका केली म्हटले होते की, आम्ही अंहकार होतो. मी म्हटले होते की, मी पुन्हा येईन, त्यासाठी अडीच वर्ष लागली. पण अडीच वर्षानंतर आलो ते तर असा आलो की दोन पक्ष फोडून आणि दोन साथीदारांनासोबत घेऊन आलो."

४०० पार म्हणजे मोदींचा जनतेबद्दला विश्वास

भाजपच्या अब की बार ४०० पार या नाऱ्यावर फडणवीस म्हणाले, "जेव्हा पंतप्रधान मोदी म्हणतात की ४०० पार करून परत येणार आहे, असे म्हणतात. त्यात मोदींच्या भावना समजून घेतल्या पाहिजे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना माणणारे लोक आहोत. आम्ही महाराजांकडून प्रेरणा घेत आहोत. शिवरायांचा राज्याभिषेक झाल्यानंतर एक दिवसही त्यांनी राजा म्हणून आनंद लुटला नाही. जगाला कळावे की, हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली आहे. हे कळण्यासाठी आणि गुलामीतून बाहेर आलो आहे. आमचे स्वत:चे अस्तित्व आहे. यानंतर साम्राज्य वाढविण्यासाठी आणि रयतेच्या भेल्यासाठी त्यांनी काम केले, असे मोदी म्हणतात. आम्ही तिसऱ्यांदा निवडून येणार याचा आम्हाला विश्वास आहे. समाज आणि विकसित भारत तयार करायचा आहे. त्यासाठी आम्हाला तिसऱ्यांदा निवडून येईयचे आहे. पंतप्रधान जे बोलत आहेत तो अहंकार नाही. जनतेबद्दलचा मोदींचा विश्वास आहे", असे फडणवीस यावेळी म्हणाले.

नेहरू घराण्यातील व्यक्ती काँग्रेस चालवू शकत नाही

घराणेशाहीवर फडणवीस म्हणाले, "घराणेशाही म्हणजे कोणत्याही राजकीय नेत्यांचा मुलगा किंवा मुलगी राजकारणात येऊ नये, असा याचा अर्थ नाही. राजकीय नेत्यांच्या पुढच्या पिढीने राजकारणात यावे. परंतु, आपल्या कर्तृत्वाने यावे. राजकारणाला स्वत:चा हक्क समजू नये. पक्षातील योग्य लोकांना दूर ठेवून कुटुंबातील लोकांकडे लक्ष दिले जाते. त्याला घराणेशाही म्हटले जाते आणि ते काँग्रेसमध्ये झाले आहे. काँग्रेसच्या ऱ्हासाचे कारण का? तर काँग्रेसमध्ये अशी धारणा आहे की, नेहरू घराण्यातील व्यक्ती काँग्रेस चालवू शकत नाही आणि काँग्रेसची आजही तीच परिस्थिती आहे. आज मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे अध्यक्ष असले, तरीही खर्गे कोणताही निर्णय घेऊ शकतात का? किंवा ते निर्णय घेऊ शकतात असे कोणाला वाटते का? शेवटी निर्णय सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी निर्णय घेऊ शकतात."

"पंतप्रधान मोदींनी घराणेशाहीचे कंबरडे मोडण्याचे काम केले आहे. आता माझा विश्वास आहे की, राजकीय नेत्यांची पुढची पिढीही राजकारणात दिसतील. पण आपल्या क्षमता आणि कर्तृत्वावर राजकारणात स्थान निर्माण करताना दिसेल. फक्त कोणाचा मुलगा किंवा मुलगी आहे म्हणून ते राजकारणात दिसणार नाही. त्या दिशेने आपल्या देशाची वाटचाल सुरू आहे", असे फडणवीस म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in