
आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवसाचे कामकाज हे विरोधकांच्या गदारोळामुळे स्थगित करण्यात आले. कांदा आणि कापसाच्या प्रश्नावरून सत्तदाहरी आणि विरोधकांमध्ये चांगलाच वाद झाला. दरम्यान, राजापूरमधील पत्रकार शशिकांत वारीस वारिसे यांच्या हत्येसंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली. ते म्हणाले की, "शशिकांत वारिसे यांच्या हत्येचा खटला फास्ट ट्रॅक (जलदगती) न्यायालयात चालवण्यात येणार आहे. आम्ही कोणालाही पाठीशी घालणार नाही आणि गुन्हेगारांना सोडणार नाही," असा इशारा त्यांनी दिला.
वारिसेंच्या हत्येसंदर्भात लक्षवेधीमध्ये मुद्दा उपस्थित करण्यात आला. "पत्रकार वारिसे हत्याप्रकरणी एसआयटीवर दबाव नसावा. या प्रकरणाचा तपास पारदर्शीपणे करावा. राजकीय हस्तक्षेप होऊ नये," असे आवाहन विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केले. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीसांनी ही घोषणा केली. तसेच, "या तपासामध्ये कुठलाही दबाव आणला जाणार नाही," असे आश्वासनही त्यांनी दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारिसे कुटुंबाला २५ लाखांची मदत केली असून कोकणात होणारी रिफायनरी सर्वांना विश्वासात घेऊन करू, असे आश्वासन उपमुख्यमंत्र्यांनी दिले आहे.