World Water Day: समुद्राचे खारे पाणी गोडे करणे खर्चिक! जागतिक दर्जाचे जलतज्ज्ञ माधव चितळे यांचे स्पष्ट मत

...म्हणून साजरा करण्यात येतो जल दिन!
World Water Day: समुद्राचे खारे पाणी गोडे करणे खर्चिक! जागतिक दर्जाचे जलतज्ज्ञ माधव चितळे यांचे स्पष्ट मत

गिरीश चित्रे/मुंबई

मुंबईचा विकास झपाट्याने होत असतानाच त्या तुलनेत मूलभूत सुविधा अपुऱ्या पडत आहेत. पाणी नाही तर सृष्टी नाही, पाणी अनमोल आहे. वाढती लोकसंख्या आणि अपुऱ्या नियोजनामुळे भविष्यात जलसंकट उभे राहण्याची शक्यता आहे. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत सद्य:स्थितीतील पाणीसाठा पुरेसा आहे का? पिण्याच्या पाण्याचे नवीन स्रोत निर्माण करणे, समुद्राचे खारे पाणी गोडे करणे, हे पर्याय खरंच मुंबईसाठी उपयुक्त आहेत का, याविषयी 'जागतिक जल दिनानिमित्त' जलतज्ज्ञ माधव चितळे यांच्याशी दैनिक 'नवशक्ति'ने केलेली खास बातचीत.

प्रश्न - समुद्राचे खारे पाणी गोडे करणे हा पर्याय कितीसा योग्य आहे?

उत्तर - मुंबईचा विकास झपाट्याने होत असून पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. पाणी साठवणीवर भर दिल्यास हे शक्य आहे. उल्हास नदीत भरपूर पाणी उपलब्ध आहे. त्यामुळे समुद्राचे खारे पाणी गोडे करणे हा खर्चिक पर्याय असून त्याची गरज नाही.

प्रश्न - पाण्याचे नवीन स्रोत निर्माण करणे शक्य नाही असे पालिका म्हणते, त्याबद्दल काय वाटते?

उत्तर - मुंबईला पाण्याची कमतरता कधीच भासू शकत नाही. नवीन धरणांची निर्मिती करणे सहज शक्य आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांचा कशा प्रकारे विकास करायचा याबाबत अहवाल मुंबई महापालिकेला दिला आहे. मुंबईचा विस्तार झाला तरी पिण्याच्या पाण्याची कमतरता भासणार नाही.

प्रश्न - भविष्यात पाणीबाणी परिस्थिती ओढवेल का?

उत्तर - मुंबई राहण्याच्या दृष्टीने महागली आहे. त्यामुळे मुंबईचे विकेंद्रीकरण, वाहतूक समस्या दूर करणे ही काळाची गरज आहे. पाणी हा मुद्दा अडचणीचा नाही. इस्रायलसारख्या देशांना भारतासारखे भाग्य मिळत नाही. भारतात पाण्याचे अनेक स्रोत आहेत. परंतु त्याला गांभीर्याने घेतले जात नाही. नवीन धरणांची निर्मिती केली तर पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही.

प्रश्न - पिण्याच्या पाण्यासाठी पालिकेचे नियोजन कमी पडते का?

उत्तर - मुंबईत १०० दिवस पावसाचे असतात. प्रत्यक्षात २० दिवस पाऊस पडतो. २० दिवसांचा पाऊस मुंबईसाठी भरपूर आहे. त्यातून वर्षभराची तहान भागवली जाऊ शकते. त्यासाठी पावसाचे पाणी साठवणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने पालिकेने पाऊल उचलणे गरजेचे आहे.

प्रश्न - पिण्याच्या पाण्यासाठी पालिकेने काय उपाययोजना करणे आवश्यक आहे?

उत्तर - मुंबईचा विकास झपाट्याने होत असून मुंबईसाठी दूरवरून पाणी आणावे लागते. पाण्याचे मूल्य वाढत आहे. त्यामुळे भविष्यात पाणी महागणार आहे. त्यामुळे पाण्याची आर्थिक घडी योग्यरीत्या बसवणे हे मुंबई महापालिकेसाठी महत्त्वाचे आहे. त्यासाठी पालिकेने उपाययोजना करणे गरजेचे आहे.

...म्हणून साजरा करण्यात येतो जल दिन

जगाला पाण्याच्या गरजेविषयी जागरूक करण्याच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्रसंघाने ‘जागतिक जल दिन’ साजरा करण्यास सुरुवात केली. १९९२ मध्ये ब्राझीलच्या ‘रिओ दि जानेरो’ येथे आयोजित केलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण आणि विकास परिषदेत ‘जागतिक जल दिन’ साजरा करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यानंतर १९९३ पासून पाण्याच्या संरक्षणाचे महत्त्व समजून घेण्यासाठी सामुदायिक जागरूकता वाढविण्यासाठी हा दिवस दरवर्षी साजरा केला जाऊ लागला. पहिल्या जागतिक जल दिवसाचे आयोजन २२ मार्च १९९३ साली करण्यात आले होते.

logo
marathi.freepressjournal.in