धारावीचे डिझाईन आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडे;नामवंत आर्किटेक्ट हफीज कॉन्ट्रॅक्टर यांची माहिती

धारावी पुनर्विकासातील सूत्रांनी सांगितले की, हफीज कॉन्ट्रॅक्टर हे इमारतीच्या डिझाईनवर लक्ष केंद्रित करतील.
धारावीचे डिझाईन आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडे;नामवंत आर्किटेक्ट हफीज कॉन्ट्रॅक्टर यांची माहिती
PM
Published on

मुंबई : आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी प्रकल्पाचा पुनर्विकास अदानी समूहातर्फे होणार आहे. या प्रकल्पाच्या डिझाईनचे काम हफीज कॉन्ट्रॅक्टर, डिझाईन कंपनी ससाकी व सल्लागार कंपनी बुरो हप्पोल्ड यांना मिळाले आहे. या प्रकल्पाचा मास्टरप्लान या कंपन्यांना बनवायचा आहे.

‘नवशक्ति’ला दिलेल्या मुलाखतीत हफीज कॉन्ट्रॅक्टर म्हणाले की, या प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. आता वास्तवातील परिस्थितीचा अभ्यास केला जात आहे. धारावीचा विकास करण्यासाठी आमचा स्वतंत्र दृष्टिकोन आहे. हा वांद्रे-कुर्ला संकुलाचा विस्तारित भाग नसेल. धारावीचे स्वत:चे सौंदर्य आहे. आम्ही असे धारावीचे डिझाईन करू की, ते जगासमोर मोठे उदाहरण ठरेल. धारावी प्रकल्प उभारताना अनेक बाबींचा विचार करावा लागणार आहे. धारावीची प्रचंड लोकवस्ती, तेथील नागरिक, त्यांचे काम, स्वच्छता, मलनिस्सारण वाहिन्या, घरे, सूर्यप्रकाश, मैदाने आदींचा विचार या प्रकल्पात केला आहे. हे काम आव्हानात्मक आहे. मी, ससाकी व हप्पोल्ड हे एकत्रितपणे काम करत आहोत. हा प्रकल्प अवाढव्य आहे. धारावीतील नागरिकांचे मत लक्षात ठेवून आम्ही याचे डिझाईन बनवत आहोत, असे ते म्हणाले.

सूत्रांनी सांगितले की, कॉन्ट्रॅक्टर, ससाकी व हप्पोल्ड यांची सेवा गेल्याच आठवड्यात घेण्याचे निश्चित झाले. धारावीची वास्तविक परिस्थिती काय आहे, याची कल्पना या तिघांना देण्यात आली. त्यांना तपशीलवार प्लॅन सादर करण्यास सांगितले आहे. या प्रकल्पात घरे व व्यावसायिक बाबी असतील.

मुंबईतील एसआरए प्रकल्पांचे काम करण्याचा हफीज कॉन्ट्रॅक्टरचा यांना अनुभव आहे. तर ससाकी ही अमेरिकेतील नामवंत डिझाईन संस्था आहे. बुरो हप्पोल्ड ही इंग्लंडमधील आंतरराष्ट्रीय सल्लागार कंपनी आहे. ही कंपनी नगर नियोजन व पायाभूत अभियांत्रिकीतील अव्वल आहे.

धारावी पुनर्विकासातील सूत्रांनी सांगितले की, हफीज कॉन्ट्रॅक्टर हे इमारतीच्या डिझाईनवर लक्ष केंद्रित करतील. ससाकी ही पुनर्विकासाचा मास्टरप्लान तयार करेल. त्यात रस्ते, रुग्णालय, शाळा व मैदानाचा समावेश असेल, तर बुरो हप्पोल्ड ही गॅस पाइपलाईन, पाण्याच्या पाइपलाईन, गटार व स्वच्छता आदींचे नियोजन करेल. हे तिघेजण सर्वंकष मास्टर प्लान बनवतील. त्यातून एकमेकांना दृष्टिकोन मिळू शकेल, असे सूत्रांनी सांगितले.

धारावी हे २.८ चौरस किमी क्षेत्रफळात वसले आहे. दहा वर्षांच्या कालावधीनंतर गेल्या नोव्हेंबरमध्ये हा प्रकल्प पुढे जाण्यास हिरवा कंदील मिळाला. अदानी समूहाने ५०६९ कोटींची बोली लावली होती.

सिंगापूर धारावीसारखेच होते

सिंगापूर गृहनिर्माण विकास मंडळाचे तज्ज्ञ यात सहभागी झाले आहेत. या मंडळाने पाच दशके सिंगापूरचे नियोजन केले आहे. त्यांच्या अनुभवातून धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे उद्दिष्ट साकार केले जाईल, असे सूत्रांनी सांगितले. १९६० च्या दशकात सिंगापूरमध्ये झोपडपट्टी, दलदल होती. सध्याची धारावीची जी परिस्थिती आहे, तीच यापूर्वी सिंगापूरची होती.

logo
marathi.freepressjournal.in